नवी मुंबई : नवी मुंबईचे आयुक्त केवळ शहरी भागाचा पाहणी दौरा करत असल्याने प्रशासन राबवित असलेले स्वच्छता सर्वेक्षणातून ग्रामीण भाग वगळला असल्याची ओरड ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त आणि प्रशासन शहरी भागातील स्वच्छतेत व्यस्त असताना शिरवणेचे भुमीपुत्र असलेल्या महापौर जयवंत सुतारांनी नवी मुंबईतील गावठाणात पाहणी अभियान सुरू केले आहे. गावातील अस्वच्छता, बकालपणा याबाबत संताप व्यक्त करत महापौर जयवंत सुतार यांनी पालिका अधिकार्यांना तर धारेवर धरलेच, परंतु गावाच्या स्वच्छतेचा आजवर ठेका घेणार्या कंत्राटदारांनाही सर्वासमोर खडे बोल सुनावण्यास कमी केले नाही.
गुरुवारी महापौर जयवंत सुतारांनी कुकशेत गाव, सारसोळे गाव, जुईपाडा गावासह अन्य गावांची पाहणी केली. यामध्ये त्यांना तुंबलेली गटारे, घाणीची दुर्गंधी, पदपथ तुटलेले, रस्ते कच्चे, धुळीचा उद्रेक या अवस्थेत गावातील ग्रामस्थ राहत असल्याचा संताप महापौर जयवंत सुतारांनी व्यक्त केला. कुकशेत व सारसोळे गावातील पाहणी अभियानामध्ये महापौरांसमवेत सभागृह नेते रवींद्र इथापे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व पालिकेतील स्वीकृत नगरसेवक सुरज पाटील परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या समस्या पाहिल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील, नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांच्या माध्यमातून सारसोळेच्या विकासासाठी ७ कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती देत सुरज पाटील यांनी लवकरच सारसोळे गावाचा कायापालट होणार असल्याची माहिती संबंधितांना दिली. महापौर जयवंत सुतार यांनी सारसोळे गावाच्या विकासाबाबत ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांना सूचना करत महापौर निधी सारसोळेच्या विकासासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी जाहिर केले.
सारसोळेतील समस्या पाहून संतप्त झालेल्या महापौर जयवंत सुतारांनी यावेळी सारसोळेतील कंत्राटदार असलेल्या प्रवीण म्हात्रेलाही धारेवर धरत ‘तुदेखील गाववाला असताना गावातल्या समस्या दिसत नाही काय’ असे खडे बोल सर्वासमोर सुनावले. सुरज पाटील, सुजाता पाटील, जयश्री ठाकूर सातत्याने सारसोळेच्या समस्यांबाबत महासभेत तसेच पालिका प्रशासनदरबारी आग्रही भूमिका मांडत असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. सारसोळे गावाबाबत मनोज मेहेर यांना सूचना करत विकासप्रक्रियेबाबतचे महापौर जयवंत सुतारांनी मार्गदर्शन करत सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन सर्वासमोर दिले.
यानंतर जुईपाडा गावात पाहणी अभियान महापौरांनी सुरू केले. तेथेही अस्वच्छता व बकालपणा, तुंबलेली गटारे हेच चित्र पहावयास मिळाले. यावेळी स्थानिक नगरसेविका तनुजा मढवी, ब प्र्रभाग समिती सदस्य विजय साळे, जयेश मढवी सहभागी झाले होते. त्यानंतर नगरसेविका सौ. रूपाली निशांत भगत यांच्याही प्रभागातील कारशेडलगतची महापौरांनी पाहणी केली. पाहणी अभियानाबाबत कल्पना देवूनही तुर्भे विभाग कार्यालयाचे अधिकारी व कमर्र्चारी उपस्थित न राहील्याने महापौर संतप्त झाले. त्यांनी तात्काळ तुर्भे विभाग कार्यालयात संपर्क करून ‘केवळ आयुक्त आल्यावर अभियानात सहभागी व्हायचे का, अशी विचारणा केली. पूर्वकल्पना देवूनही तुर्भे विभाग कार्यालयाचे कोणीही अभियानादरम्यान उपस्थित न राहील्याने या प्रकाराची आपण पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे महापौरांनी संबंधितांना सांगितले.