नवी मुंबई :- महापालिका प्रशासनाकडून सर्व शहरात स्वच्छता सर्वेक्षण राबविले जात असताना महापालिका प्रभाग ८४ मध्ये कोठेही हे सर्वेक्षण राबविले जात नाही, भिंतीची रंगरंगोटी नाही, स्वच्छता मोहीम नाही, पथनाट्य नाही याबाबत लेखी स्वरूपात नाराजी व्यक्त करत नेरूळ सेक्टर दोन परिसरात लवकरात लवकर स्वच्छता सर्वेक्षण अभियान राबविण्याची लेखी मागणी भाजपचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण यांनी नेरूळ पालिका विभाग अधिकार्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
स्वच्छता सर्वेक्षण केवळ शहराच्या दर्शनी भागात राबविले जात असून अर्ंतगत भागात हे राबविले जात नसल्याचा आरोपही विलास चव्हाण यांनी या निवेदनातून केला आहे. नेरूळ सेक्टर दोनमधील राजीव गांधी उड्डाण पुलाची भिंतही विद्रुप झाली आहे. परिसरात कोणत्याही प्रकारचे साईन बोर्ड नाही. भिंतीची रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. प्रभाग क्रं ८४ला स्वच्छता सर्वेक्षणातून वंचित ठेवले असल्याची शंकाही विलास चव्हाण यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.
शहराची रंगरंगोटी होत असताना नेरूळ सेक्टर दोनबाबत पालिका प्रशासन दुजाभाव का करत आहे असा प्रश्न उपस्थित करून नेरूळ सेक्टर दोन परिसरात लवकरात लवकर स्वच्छता सर्वेक्षण राबविण्याची मागणी विलास चव्हाण यांनी केली आहे.