नवी मुंबई :- नवी मुंबई महापालिका प्रशासनाने स्वच्छता सर्वेक्षणामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक आणण्यासाठी परिश्रमाची शिकस्त चालविली असतानाच लोकप्रतिनिधींनीही त्यात आपले सक्रिय योगदान देण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील यांनी नेरूळ परिसरात पुढाकार घेतला असून घरटी जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम अंगिकारला आहे.
सुरज पाटील यांनी नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गाव आणि कुकशेत गाव परिसरात स्वच्छतेविषयी जनजागृती अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या, पक्षीय पदाधिकार्यांच्या तसेच दररोज संपर्कात येणार्या गृहनिर्माण सोसायट्याच्या पदाधिकार्यांच्या, रहीवाशांच्या भेटीगाठी घेवून स्वच्छतेबाबत जनजागृतीपर प्रबोधन करण्यास सुरूवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता सर्वेक्षणाचे पत्रकासोबत स्वत:चे लेटरहेडवरही स्वतंत्र पत्रक वितरीत करताना सुरज पाटील यांनी घरटी जनजागृतीला प्राधान्य दिले आहे.
या पत्रकात सुरज पाटील यांनी गतवर्षी देशाचा स्वच्छता सर्वेक्षणात आठवा क्रमांक आला असुन यंदा देशात आपल्या शहराचा प्रथम क्रमांक यावा यासाठी सर्वांनी स्वच्छतेत योगदान देण्याचे सुरज पाटील यांनी आवाहन केले आहे. आपला परिसर, सोसायटी, सेक्टर, गाव, सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ स्वच्छ ठेवण्याकरिता सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सुरज पाटील यांनी म्हटले आहे.