सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : शहर स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून किमान आपल्यामुळे शहर अस्वच्छ होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे व आपण निर्माण करीत असलेला कचरा घरातच ओला व सुका असा वेगवेगळा ठेवून शहर स्वच्छतेत आपले योगदान दिले पाहिजे असे आवाहन नागरिकांना करत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी कोपरखैरणे विभागातील वाणिज्य क्षेत्र तसेच गाव व झोपडपट्टी भागाला भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली
नवी मुंबई : शहर स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून किमान आपल्यामुळे शहर अस्वच्छ होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे व आपण निर्माण करीत असलेला कचरा घरातच ओला व सुका असा वेगवेगळा ठेवून शहर स्वच्छतेत आपले योगदान दिले पाहिजे असे आवाहन नागरिकांना करत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी कोपरखैरणे विभागातील वाणिज्य क्षेत्र तसेच गाव व झोपडपट्टी भागाला भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली
व स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या.
या पाहणी दौ-यात आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण व श्री. रमेश चव्हाण, परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी, कार्यकारी अभियंता श्री. अनिल नेरपगार, स्वच्छता अधिकारी श्री. प्रल्हाद खोसे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पाहणी दौ-यादरम्यान आयुक्तांना अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर पाणी टाकल्याचे आढळून आले, त्यामुळे शहर स्वच्छतेला बाधा पोहचत असल्याने आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्याही प्रकारे रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी जमिनीवर पाणी टाकून अस्वच्छता करू नये असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करतानाच अशाप्रकारे अस्वच्छता करण्यात आल्यास नागरिकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येईल असे सूचित करण्यात येत आहे.
कोपरखैरणे विभागातील सेक्टर 9 व 10, 11, 15 व 16 तसेच रेल्वे स्टेशन परिसर या भागातील वाणिज्य क्षेत्राची पाहणी करून त्याठिकाणी दुकानदार ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र कचरा पेट्या वापरतात काय याचीही आयुक्तांनी काळजीपूर्वक पाहणी केली. काही दुकानदारांना कच-याच्या पेट्या सुस्थितीत असाव्यात अशा सुचना त्यांनी केल्या. बालाजी थिएटर ते पंचरत्न हॉटेल तसेच गुलाबचंद डेरी ते फ्रेंड सर्कल अशा वाणिज्य क्षेत्रातील पाहणीमध्ये त्यांनी दुकानांमुळे शहर स्वच्छतेला बाधा पोहचत नसल्याची खात्री करून घेतली. कोपरखैरणे भागात दर्शनी क्षेत्रातील काही पडीक जागांचे हिरवळ लावून सुशोभिकरण करण्याच्या सूचना देताना त्यांनी सुशोभिकरण झालेल्या काही जागांची पाहणी त्यांनी केली.
अशाचप्रकारे समता नगर भागात परिसर स्वच्छतेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच सामुदायिक / सार्वजनिक शौचालयांमधील स्वच्छता व अनुषांगिक व्यवस्था यांची पाहणी आयुक्तांनी केली. त्याचप्रमाणे हनुमान नगर महापे भागातही स्वच्छता व शौचालयांची पाहणी केली. झोपडपट्टी परिसरात नागरिकांशी सुसंवाद साधताना त्यांनी ओला व सुका कचरा घरापासूनच वेगवेगळा ठेवावा व महानगरपालिकेच्या कचरा गाडीतही वेगवेगळ्या भागांमध्ये टाकावा असे त्यांनी सूचित केले. अडवली भूतवली शाळेतील स्वच्छतेची व कंपोस्ट पिट्सची पाहणी त्यांनी केली. त्याभागात एम.आय.डी.सी. कडून होणारा पाणीपुरवठा दिला जात असल्याने शटडाऊनच्या काळात शौचालयांना पाण्याची कमतरता भासते. यावर त्वरीत उपाययोजना करीत त्याठिकाणी टाक्या बसवून पाणी साठविण्याची अतिरिक्त व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
कोपरखैरणे विभागाचा पाहणी दौ-यात “स्वच्छ सर्वेक्षण 2018” मध्ये संपूर्ण देशात नवी मुंबई शहराचा क्रमांक पहिला आणण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून संपूर्ण नवी मुंबई शहर तयारीला लागले असून नागरिकांनी या स्वच्छता कामात शहरात कुठेही साधा कागदाचा तुकडाही न टाकता तसेच रस्त्यावर कुठेही पाणी न टाकता आपण कोणत्याही प्रकारे अस्वच्छता करणारच नाही असा निश्चय करून सहकार्य करावे. त्याचप्रमाणे विविध उपाययोजनांतून शहर स्वच्छतेत आमुलाग्र बदल झाल्याचे दिसत असून केंद्र सरकारमार्फत स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शहर स्वच्छतेविषयी विचारणा करण्यात येणा-या प्रश्नांची नागरिकांनी 1969 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून अथवा https:// swachhsurvekshan2018.org/ citizenfeedback या लिंकवर प्रतिक्रिया नोंदवून किंवा केंद्र सरकारकडून येणा-या फोनवरुन विचारणा करण्यात येणा-या प्रश्नांवर नंबर वन प्रतिक्रिया देऊन शहराचे मानांकन सर्वोत्तम करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.