सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- पामबीच मार्गावर खाडीअर्ंतगत भागात असणार्या बामणदेव मार्गाची आज श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बामणदेव मार्गावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेमध्ये वनविभागाचे कर्मचारी, पालिका कर्मचारी, शालेय शिक्षक, नगरसेवक, माजी नगरसेवक, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, पालिका प्रभाग समिती सदस्य, सारसोळेचे ग्रामस्थ, नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी, रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकारी व रिक्षाचालक आणि बालकही सहभागी झाले होते.
दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिनी बामणदेवाचा भंडारा सारसोळेच्या कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून सारसोळेेचे ग्रामस्थ आयोजित करत असतात. सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात बामणदेवाचे मंदिर असून बामनदेव हे सारसोळेच्या ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. मासेमारीसाठी खाडीत गेल्यावर तसेच खाडीअर्ंतगत परिसरात वावरताना बामनदेवच आपले रक्षण करतो, अशी या ग्रामस्थांची धारणा आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सारसोळेतील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून सारसोळेचे ग्रामस्थ बामणदेवाचा भंडारा आयोजित करतात. बामणदेवाकडे जाणारा मार्ग आजही कच्चा व खाचखळग्यांचा आहे. पावसाळ्यामध्ये या मार्गावर मोठ्या प्रमाणावर जंगली झुडूपे व गवत उगवते. त्यामुळे या मार्गावरून जाणे अशक्य होते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भंडारा साजरा करण्यापूर्वी या मार्गाची सारसोळेचे ग्रामस्थ सफाई करत असतात. यावेळी वनविभाग (कांदळवन) व ग्रामस्थांच्या वतीने सफाईसाठी संयुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वनविभागाकडून (कांदळवन) शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनची वेळ निश्चित करण्यात आली. सारसोळेचे ग्रामस्थ, महापालिका ब प्रभाग समिती सदस्य आणि कोलवाणी माता मित्र मंडळाचे सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी या अभियानात महापालिका प्रशासनानेही सहभागी व्हावे याकरिता पालिका प्रशासनदरबारी पत्रव्यवहार केला. सोशल मिडीयावरून या अभियानात नवी मुंबईकरांनी सहभागी व्हावे याकरिता मनोज मेहेर यांनी जनजागृतीही केली.
दुपारी तीन वाजता या बामणदेव मार्गावर स्वच्छता अभियानास सुरूवात झाली. अवघ्या अडीच तासात म्हणजे साडे पाच वाजेपर्यत मंदिर परिसरापर्यत सफाई करण्यात आली. या अभियानात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले, ब प्रभाग समिती सदस्य बिपीन झवेरी, प्रभाग ८४चे भाजपचे वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण, शरद पाजंरी, शलाका पांजरी, प्रशांत सोळसकर व जाणता राजा मित्र मंडळाचे कार्यकर्ते, सोपान सावंत, अनुप मार्कडे, अकुंर मुनवर, दिनेशभाई, अखिलभाई, मास्टर विराज चव्हाण यांच्यासह महापालिका कर्मचारी, वनविभाग कमर्र्चारी, रिक्षा संघटनाचे पदाधिकारी व रिक्षाचालक, कोलवाणी माता मित्र मंडळाचे सदस्य व पदाधिकारी, सारसोळेचे ग्रामस्थ आणि नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी या अभियानात सहभागी झाले होते. सुरज पाटील यांनी अभियानात सहभागी झालेल्यांचे आभार मानत बामणदेव भंडार्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या अभियानात शंभरहून अधिक सहभागी झाले होते.