मुंबई दि. 4 : आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असून, केवळ तीन दिवसात दहा हजार समाजमाध्यमकारांनी सहभाग नोंदवला आहे.
देशातील बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत असतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. विधायक संदेशाची देवाण-घेवाण होत असेल तर विवेकी समाज तयार होतो हे सूत्र लक्षात घेऊन सकारात्मक बाबींसाठी समाजमाध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करणाऱ्या समाजमाध्यमकारांचा गौरव करण्याच्या दृष्टिने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसाधारपणे प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे त्याभागातील प्रभावी समाजमाध्यमकारांची विविध निकषांच्या आधारे निवड करून त्यांना मा. मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील मिळणार आहे.
या उपक्रमात विशेषता ग्रामीण भागातून उत्साहपूर्वक प्रतिसाद मिळत असून सर्व स्तरातून समाजमाध्यमकार सहभागी होत आहेत. यामध्ये युवक-युवती अग्रस्थानी आहेत. सकारात्मक व सौहार्दपूर्ण महाराष्ट्र बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी ‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
या उप्रकमासाठी 1 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु झाली असून ती 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’ अथवा ॲपलच्या ‘’ॲप स्टोअर वरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी 10 ‘सोशल मीडिया महामित्र’ निवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी,जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांना‘सोशल मिडिया महामित्र’ पुरस्कार देण्यात येईल तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे.
विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप पाच ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या, फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या, किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत, सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते, सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत, आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. या आधारे महामित्र निवडण्यात येतील. या निकषांना मिळणाऱ्या गुणांकनाच्या आधारे आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल. निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.