सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : सध्या नेहमीच्या शैक्षणिक क्षेत्रांव्यतिरिक्त आपल्याकडे असणारे वेगळ्या प्रकारचे अतिरिक्त कौशल्य रोजगार मिळण्यासाठी महत्वाचे ठरत असून युवकांनी त्यादृष्टीने आपल्यात रोजगारासाठी पूरक कौशल्ये विकसित करायला हवीत असे सांगत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सध्या सेवा क्षेत्रांमधील वाढती मागणी लक्षात घेऊन तरूणाईने त्यादृष्टीने स्वत:ला विकसित करावे अशा शब्दात तरूणाईशी संवाद साधला.
जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे महानगरपालिकेच्या शंकरराव विश्वासराव विद्यालय शाळा क्र. 28, सेक्टर 15/16, वाशी येथे आयोजित ‘रोजगार मेळावा आणि लाभार्थी नोंदणी अभियान’ प्रसंगी ते उपस्थितांशी संवाद साधत होते.
‘स्वच्छ भारत मिशन’ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत आपल्या नवी मुंबई शहराचे स्वच्छतेतील मानांकन उंचावण्यासाठी नागरिक प्रतिसाद अतिशय महत्वाचा असून त्याकरिता उपस्थित प्रत्येकाने स्वत:च्या मोबाईलवरून 1969 या टोल फ्री क्रमांकावर विनामूल्य फोन करावा व तो फोन कट होऊन केंद्र सरकारकडून शहर स्वच्छतेविषयी प्रतिक्रिया विचारण्यासाठी फोन आल्यानंतर विचारल्या जाणा-या शहर स्वच्छताविषयक प्रश्नांची उत्तम उत्तरे द्यावीत असे आवाहन आयुक्तांनी केले. त्याशिवाय www.swachhsurvekshan2018.org/c
याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते काही तरूणांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली.
यावेळी सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे यांनी आपल्या मनोगतात नवी मुंबईतील जास्तीत जास्त तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा महानगरपालिकेचा प्रयत्न असून तरूणांनीही बदलत्या काळाची पावले ओळखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात योग्य शिक्षण घ्यावे असे सांगितले. या मेळाव्याच्या अनुषंगाने तरूणाईला स्वच्छतेचे महत्व विषद करताना देशाचे भविष्य असणा-या तरूणाईकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगत श्री. रविंद्र इथापे यांनी उपस्थित तरूणांमार्फत स्वच्छतेबाबत विचारल्या जाणा-या सहा प्रश्नांविषयी महानगरपालिकेने केलेल्या कामांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविकपर मनोगतात रोजगार मेळाव्याला अडीच हजाराहून अधिक युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच आज ज्यांची निवड होणार नाही त्यांनी निराश न होता स्वत:मधील कमतरतेचा शोध घेऊन अंगभूत क्षमतांचा विकास करावा असे सांगितले. भविष्यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राजवळ येणारे विमानतळ, सेवा क्षेत्रांमध्ये होणारी वाढ, आरोग्य सेवांची वृध्दी अशा विविध बाबी लक्षात घेऊन त्यासाठी पूरक कौशल्य प्रशिक्षण युवक-युवतींना उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
सकाळी 9 वाजल्यापासूनच सुशिक्षित बेरोजगार तरूण-तरूणींनी रोजगार मेळाव्याठिकाणी गर्दी केली होती. त्याठिकाणी प्रत्येक उमेदवाराची नोंदणी व माहितीचे अर्ज भरून घेण्यात येत होते, त्यांना मेहंदी शिवणकामापासून अकाऊंटींग, संगणकीय, बँकींग पर्यंतच्या विविध व्होकेशनल प्रशिक्षणाची माहिती देण्यात येत होती व कौशल्य प्रशिक्षणासाठी इच्छुकांचे नोंदणी अर्ज भरून घेण्यात येत होते, उपस्थित तरूणांकरिता करियर निवडीबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
या रोजगार मेळाव्यात रिलायन्स डिजीटल, 360 डिजीटल हब, किर्ती इन्स्टिट्यूट इंडिया, युरेका फोर्बस्, स्मार्ट एच.आर. सर्व्हिस अशा विविध नामांकित कंपन्यांतर्फे माहिती-तंत्रज्ञान, विमा, बँकींग, इलेक्ट्रिकल, रिटेल, फायनान्स, सेल्स, हाऊसकिपींग, सुरक्षा, हॉस्पिटॅबिलिटी, बी.पी.ओ. अशा विविध क्षेत्रात थेट मुलाखतीव्दारे 550 हून अधिक युवक-युवतींना प्रत्यक्ष निवड व नियुक्तीपत्र देण्यात आली.
सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने युवक-युवतींना डेझ व्ह्यू स्किल लर्निंग ॲण्ड ट्रेनिंग सिस्टीम रबाले एमआयडीसी, ज्ञानविकास संस्था कोपरखैरणे, चॅनल एच आर ॲण्ड स्किल डेव्हलपमेंट वाशी, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सानपाडा, सेमी इन्फोटेक सीवूड नेरूळ, सॉफ्ट कन्सेप्ट टेक्नोलॉजी वाशी, एज्यु वे अकॅडमी सीबीडी बेलापूर, ॲपरल ट्रेनिंग ॲण्ड डिझायनींग सेंटर सानपाडा, जी स्पा सीवूड नेरूळ, 360 डिजीटल हब वाशी या कौशल्य प्रशिक्षण देणा-या संस्थाच्या वतीने विनामूल्य रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जात असून त्यांना योग्य क्षेत्रात रोजगार उपलब्ध होईल यासाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. 2500 हून अधिक युवक-युवतींना सहभाग घेतलेल्या या रोजगार मेळाव्यातूनही हेच उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे.