आमदार मंदाताई म्हात्रे यांचे सर्व स्तरातून कौतुक
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना 1972 नंतर अखेर न्याय मिळाला असून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील जमिनी संपादित केल्यानंतर 24 पैकी 14 गावांच्या गावठाणांचे ठाणे जिल्हाधिकारी मार्फत सर्वेक्षण पूर्ण होऊन मालमत्ता पत्राचे वाटप करण्यास अखेर सुरुवात झाली. याच अनुषंगाने शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत सिटी सर्वेक्षण झालेल्या गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वितरणास प्रत्येक गाव निहाय सुरुवात होणार आहे. याच अनुषंगाने सोमवार दि. 08.02.2018 रोजी बेलापूर गाव, अग्रोली, दिवाळे, शहाबाज, फणसपाडा व किल्ले या गावठाणातील ग्रामस्थांना एकूण900 प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात येणार असल्याचे बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले…. तसेच शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत शासकीय अधिकारी स्वतः आपल्या दारात येऊन आपली मालमत्ता पत्रके वाटप करणार असून सदर मालमत्ता पत्रके वाटप शिबिरे प्रत्येक गावात घेण्यात येणार आहेत. सदर शिबिराची सुरुवात सोमवार पासून बेलापूर गावातून होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबई हे विकसित शहर असून शहराच्या विकासासाठी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी त्यांच्या 100% जमिनी दिलेल्या आहेत. गावठाणातील ग्रामस्थांची बांधलेली घरे नियमित करावीत, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, या संदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी अनेकवेळा शासनदरबारी पाठपुरावा केला होता. नगरविकास प्रधान सचिव नितीन करीर, सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी तसेच ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांजबरोबरही सदर संदर्भात अनेक बैठकी झाल्या होत्या तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता पत्रके (प्रॉपर्टी कार्ड) मिळावे हा अनेक वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा, याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गावागावात जाऊन प्रकल्पग्रस्तांसह गावबैठकी घेतल्या होत्या. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश येऊन नवी मुंबई गावठाणक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या घरांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते बेलापूर व शिरवणे गाव येथील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली होती. आता स्वतः शासकीय अधिकारी शासन आपल्या दारी अंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरण करणार आल्याने सर्व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी हा मोठा निर्णय असून गावठाणातील प्रत्येक घरांस आपल्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असल्याने आपल्या मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा प्रकल्पग्रस्तांना मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मालमत्ताबाबत कायदेशीर प्रक्रिया व घरे विकसित करण्याकरिता येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. अनेक वर्षापासुनचा सदर प्रश्न मार्गी लागल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक केले जात आहे.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील ग्रामस्थांनी त्यांच्या 100% जमिनी दिलेल्या असताना नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रत्येक घराला मालमत्ता पत्रके (प्रॉपर्टी कार्ड) देण्यात यावे, हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस तसेच शासनदरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी यांजसमवेतही अनेक बैठकी पार पडल्या. सदर प्रश्नाबाबत गावागावात ग्रामस्थांच्या बैठकीही घेतल्या गेल्या. आज अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे नवी मुंबई ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांना आपल्या मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा मिळाला असल्यामुळे अनियमित घरे नियमित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे त्या म्हणाल्या.