नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती दिसून येत असून कच-याचे घरापासूनच ओला व सुका असा वेगवेगळा करण्याचे प्रमाण 85 टक्क्याहून अधिक वाढताना दिसत आहे. असेच स्वच्छताप्रेमी वातावरण शहरात कायम रहावे याकरीता महानगरपालिका प्रयत्नशील असून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहयोगाने स्वच्छतेमध्ये देशात अव्वल नंबर मिळविण्याचे ध्येय प्रत्यक्षात येईल असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी घणसोली, राबाडे, ऐरोली विभागातील स्वच्छतेची बारकाईने पाहणी केली. सर्व ठिकाणी अधिक स्वच्छता राखण्याच्या व साफसफाई झाल्यानंतर नागरिकांकडून थोडीही अस्वच्छता होणार नाही याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण व श्री. रमेश चव्हाण, परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे व श्री. तुषार बाबर, कार्यकारी अभियंता श्री. अनिल नेरपगार व श्री. संजय देसाई आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
घणसोली सेक्टर 6 येथील स्वच्छतेची पाहणी करताना त्यांनी गोल्ड क्रिस्ट सोसायटीला भेट देऊन ओल्या कच-यापासून खत निर्मिती करणा-या यंत्राची पाहणी केली. घणसोलीगांव, तळवलीगांव, शिवकॉलनी सेक्टर 1 ऐरोली, समता नगर ऐरोली याठिकाणी शौचालयातील साफसफाई, लिक्विड सोपची व्यवस्था, पाणीपुरवठा, अपंगांसाठी रॅम्प सुविधा अशा विविध बाबींची पाहणी केली व त्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. दौ-यात विविध ठिकाणी आढळून आलेल्या दूर्लक्षित जागांच्या ठिकाणी हिरवळ लावणे तसेच फुलांच्या कुंड्या ठेवून परिसर सुशोभित करणे अशा उपाययोजना करण्यास त्यांनी सांगितले. कुठेही प्लास्टिक व कुठल्याही प्रकारचा कचरा दिसणार नाही याविषयी दक्षता घेण्याचे त्यांनी सूचित केले.
ऐरोली सेक्टर 14, 15 येथील वाणिज्य भागाला भेट देऊन दिवसा व रात्री दोन वेळा मुख्य रस्त्यांची साफसफाई केली जाते आहे काय याची त्यांनी तपासणी केली. तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यावरील छोट्या कचरा कुंड्या (leter Bins) वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. सेक्टर 5 ऐरोली येथील पेट्रोलपंपामधील शौचालय सर्वांसाठी खुले आहे याबाबत त्यांनी माहिती घेतली व तेथील स्वच्छतेचीही पाहणी केली.
“स्वच्छ सर्वेक्षण 2018” मध्ये नवी मुंबई शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवून द्यायचाच याकरीता संपूर्ण नवी मुंबई नागरिक सज्ज असून केंद्र सरकारमार्फत स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शहर स्वच्छतेविषयी विचारणा करण्यात येणा-या प्रश्नांची नागरिकांनी 1969 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून अथवा https://swachhsurvekshan2018. org/citizenfeedback या लिंकवर प्रतिक्रिया नोंदवून किंवा केंद्र सरकारकडून येणा-या फोनवरुन विचारणा करण्यात येणा-या प्रश्नांवर आपल्या नवी मुंबई शहरातील स्वच्छतेत नजरेत भरणारा आमुलाग्र बदल लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिक्रिया द्याव्यात व शहराचे मानांकन देशात सर्वोत्तम करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.