पनवेल संघर्ष समितीने केली होती तक्रार
दिपक देशमुख
नवी मुंबई :- कामोठे शहरातील गुटखा विक्री एजंटच्या घरावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत 4 लाख 54 हजार 400 रूपये किंमतीचा विमल पान मसाला कंपनीचा गुटखा हस्तगत केला आहे.
नवी मुंबई :- कामोठे शहरातील गुटखा विक्री एजंटच्या घरावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत 4 लाख 54 हजार 400 रूपये किंमतीचा विमल पान मसाला कंपनीचा गुटखा हस्तगत केला आहे.
ओंकार रामसंजीवन गुप्ता असे आरोपी एजंटचे नाव आहे. कामोठे येथील त्याच्या निवासस्थानी वितरण करण्यासाठी गुटख्याचा अवैध साठा ठेवल्याची तक्रार पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि काही सदस्यांनी पेण येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांच्याकडे केली होती. संगत यांनी सदर माहितीची खातरजमा केली. त्याच दरम्यान, कामोठे शहर पोलिसांनांही याबाबतीत त्यांच्याकडे माहिती पुरवल्याने ही कारवाई केली.
पनवेल संघर्ष समितीने ‘गुटखा मुक्त पनवेल, गुटखा मुक्त रायगड’, चा नव्या वर्षाला संकल्प करून शासकीय अधिकार्यांच्या सहकार्याने ती मोहिम राबविली जात आहे. पनवेलमधील दीपा व विनम्र बारच्या टपरीवर अवैध विक्री होणार्या गुटखाविरोधी कारवाई केली. त्यापाठोपाठ अलिबाग, खारघर आणि शिरढोण येथील गोदामांना सील ठोकले. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पनवेलशहरासह महापालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात अवैधरित्या गुटख्याची विक्री जोमात सुरू होती. पनवेल संघर्ष समितीच्या तक्रारीनंतर छापे मारून अन्न व औषध प्रशासनाने दरारा निर्माण केला आहे. त्यांनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू केलेल्या कारवाईने उघडपणे गुटखा विक्री करणार्यांची गोची झाली आहे. अद्याप काही जणांनी चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरूच ठेवली असल्याने त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी आता सामान्यांकडूनही मागणी होऊ लागली आहे.
दरम्यान, ओंकार रामसंजीवन गुप्ता याने साठा केलेला 4 लाख 54 हजार 400 रूपयांचा विमल कंपनीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतला असून या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, सुप्रिया जगताप आणि कामोठे पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
या कारवाईबाबत संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी समाधान व्यक्त केले असून पुढील आठवड्यात कळंबोली आणि पनवेल शहरातील काही गोदामांवर छापे टाकण्याची विनंती संगत यांना केली आहे.