** घनसोली-पामबीच मार्गाचे काम एमएमआरडीएने हाती घ्यावे
** आमदार संदीप नाईक यांची एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांच्याकडे मागणी
नवी मुंबई :- नवी मुंबईत अस्तित्वातील आणि भविष्यकालिन वाहतुककोंडी कमी करण्यासाठी आमदार संदीप नाईक यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर एमएमआरडीए दोन उडडाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एमआयडीसीने देखील या मार्गावर स्कायवॉक उभारले आहेत. भविष्यातील वाढती वाहनांची संख्या आणि वाढती लोकसंख्या यामुळे या मार्गावर वाहतुककोंडीची समस्या गंभीर बनणार आहे हे ध्यानात घेवून आमदार नाईक यांनी गुरुवारी एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांची भेट घेवून त्यांना तुर्भे स्टेशनलगत चार मार्गिकेचा उडडाणपूल आणि ऐरोली-काटई उन्नत मार्गावर दोन मार्गिका उभारण्याची मागणी केली. तसेच सिडकोमुळे नवी मुंबई महापालिकेवर पडलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी घनसोली ते ऐरोली पामबीच मार्गाचे काम एमएमआरडीएने स्वतःकडे हस्तांतरित करुन घ्यावे, अशी मागणी देखील केली. आयुक्त मदान यांनी या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली.
ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे स्टेशनलगत चार मार्गीका उड्डाणपूल…
नवी मुंबई क्षेत्रातील ठाणे-बेलापूर महामार्गावर तुर्भे स्टेशनलगत तुर्भे स्टोअर व हनुमान नगर या ठिकाणी फार मोठ्या संख्येने नागरीक वास्तव्यास आहेत. तुर्भे रेल्वे स्टेशनला कामानिमित्त जाण्यासाठी हजारो नागरीकांना आणि कामगारांना ठाणे-बेलापूर महामार्ग ओलांडून जावा लागतो. ठाणे-बेलापूर महामार्ग या ठिकाणी दररोज हजारो लहान मोठ्या वाहनांची सतत ये-जा सुरु असते. त्यामुळे नागरीकांना जीव धोक्यात घालून हा महामार्ग ओलांडून रेल्वे स्टेशनकडे जावे लागते, असे आमदार नाईक यांनी आयुक्त मदान यांच्या निदर्शनास आणून दिले. या परिसरात वाढलेली लोकवस्ती तसेच वाहनांची वाढती वर्दळ त्यामुळे तुर्भे रेल्वे स्टेशन लगत तुर्भे स्टोअरजवळ वारंवार अपघाताच्या दुर्घटना घडतात. त्यामध्ये अनेक नागरीकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. यासाठी तुर्भे स्टेशन परिसरात चार मार्गीकेचा उड्डाणपूल बांधण्याची तेथील नागरीकांकडून सातत्याने मागणी होत आहे. ही बाब ध्यानात घेऊन आमदार नाईक यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या भागाची पाहणी केली असता सदरचा महामार्ग ओलांडणे तेथील नागरीकांसाठी अतिशय धोक्याचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ठिकाणी चार मार्गीका उड्डाणपूल बांधण्याची नितांत आवश्यकता आहे, असे आमदार नाईक म्हणाले.
नवी मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएने या भागाचे सर्वेक्षण केल्यास उपरोक्त ठिकाणी चार मार्गीकेचा उड्डाणपूल बांधणे अत्यंत आवश्यक असल्याचे आपल्या निदर्शनास नक्कीच येईल, अशी सुचना त्यांनी केली. २०१७ च्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तुर्भे येथे उड्डाणपुल बांधण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली असता, नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी याबाबत परिपूर्ण प्रस्ताव आल्यास या ठिकाणी उड्डाणपुल बांधण्याबाबत निश्चीत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आमदार नाईक यांना दिले आहे. ठाणे-बेलापूर महामार्गावर तुर्भे स्टेशन लगत तुर्भे स्टोअर येथे चार मार्गीकेचा उड्डाणपूल बांधण्याबाबत व त्यासाठी लागणारा निधी व आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याबाबत सत्वर कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात जेणेकरुन त्या ठिकाणी होत असलेले अपघात व जीवीतहानी टळू शकेल, अशी मागणी आमदार नाईक यांनी आयुक्त मदान यांच्याकडे केली आहे.
ऐरोली-काटई या प्रस्तावित ऐलिव्हीटेड मार्गावर मार्गीका ….
मुंबई, ठाणे, नवी मुंबई इत्यादी विकसित शहरांमध्ये पायाभूत सुविधा तसेच नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एमएमआरडीए अशा शहरांचे सर्व्हेक्षण करुन विकासकामे करत असते. त्यानुसार नवी मुंबईत देखील विकासाच्या दृष्टीने उड्डाणपूल आणि उन्नत मार्ग यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
ऐरोली-काटई या प्रस्तावित ऐलिव्हेटेड मार्गावरील पहिल्या टप्यातील ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड-भारत बिजली कंपनी या उन्नत मार्गावर मुंबईतून नवी मुंबईत येताना ऐरोली मार्गे न येता या उन्नत मार्गावरुन नवी मुंबईत येण्यासाठी नागरिकांच्या सोयीच्यादृष्टीने सदर उन्नत मार्गावर एक मार्गिका बांधणे आवश्यक आहे, याकडे आमदार नाईक यांनी आयुक्त मदान यांचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे नवी मुंबईतून मुंबईत जाताना देखील ऐरोलीमार्गे न जाता थेट मुंबईत जाण्यासाठी नवी मुंबईतील एमआयडीसी क्षेत्र आय.टी. क्षेत्र तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती इत्यादी क्षेत्रातील मुंबईत राहणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी सदर उन्नत मार्गावर जाण्यासाठी एक मार्गिका बांधणे देखील गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. तरच मुंबईतून नवी मुंबईत व नवी मुंबईतून मुंबईत जाण्या-येण्यासाठी येणारा नियोजित उन्नत मार्ग उपयुक्त ठरु शकेल अन्यथा
ऐरोली मार्गे आल्यास ऐरोलीत प्रचंड वाहतुक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भविष्यात नवी मुंबईत होणार्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे तेथे जाणार्या व येणार्या वाहतुकीमुळे मुंबईकडून नवी मुंबईकडे व नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी मार्गिका नसल्यामुळे ऐरोली मधूनच वाहतुकीला जावे लागेल. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात ऐरोलीच्या प्रवेशद्वाराजवळ व ऐरोलीमध्ये वाहतुक कोंडीचा धोका संभवतो. ऐरोलीतील नागरिकांना वाहतुककोंडी मुक्त शहर करण्याच्या उद्देशाने मुंबईतून नवी मुंबईत व नवी मुंबईतून मुंबईत जाणारी वाहतुक थेट या उन्नत मार्गावर जाण्यासाठी नवी मुंबईतून मुंबईत जाणार्या मार्गिकेवर व मुंबईतून नवी मुंबईत येणार्या मार्गिकेवर ठाणे-बेलापूर मार्गावर किंवा भारत बिजली कंपनीच्या मागील मुकंद कंपनी (दिघा) महापे एमआयडीसी रोड येण्यासाठी योग्य ठिकाणी एक मार्गिका तसेच मुंबईत जाण्यासाठी ठाणे-बेलापूर रोड किंवा भारत बिजली कंपनीच्या मागील मुकंद कंपनी (दिघा) महापे एमआयडीसी रोड या ठिकाणी सदरच्या दोन मार्गिका बांधणेबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.
घणसोली ते ऐरोली पामबीच मार्गाचे काम एमएमआरडीएने हाती घ्यावे…
नवी मुंबईची वाढती लोकसंख्या व त्यामुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ त्याचबरोबर या शहारात सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती, पुढे जेएनपीटीसारखे भव्य बंदर यामुळे अवजड वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. त्यामुळे नवी मुंबई शहरात वाहतुकीची प्रचंड समस्या भेडसावत असते. नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढणार असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी सिडकोने घणसोली ते ऐरोली असा पामबीच मार्ग बांधण्याचे काम हाती घेतले होते. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर काम झाले असताना या कामामध्ये खारफुटी आल्यामुळे केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी गेल्या अनेक वर्षापासून हे काम थांबविण्यात आल्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. घणसोली नोड विकसित करुन अथवा या नोडमध्ये विविध स्वरुपाची करावयाची विकासाची कामे याचा संपूर्ण आढावा घेऊन त्यासाठी लागणारा आवश्यक असलेला खर्च निश्चित करुन तो नवी मुंबई महानगरपालिकेला वर्ग करावा व त्यानंतरच घणसोली नोड महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावा यासाठी आमदार नाईक यांचा सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा सुरु होता. परंतु याप्रकरणी निर्णय न घेताच सिडकोकडून घणसोली नोड घाईगडबडीने नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. सिडकोने घणसोली ते ऐरोली या अर्धवट अवस्थेत असलेला पामबीच मार्गाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर सोपाविली आहे. त्यामुळे अधिकचा आर्थिक बोजा महापालिकेवर पडून त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होऊ शकतो, असे आमदार नाईक यांनी आयुक्त मदान यांना सांगितले. या सर्व बाबी विचारात घेऊन घणसोली ते ऐरोली पामबीचचे काम महानगरपालिकेवर न सोपविता त्याची जबाबदारी एमएमआरडीएने घ्यावी व त्याकरिता आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करावी. जेणेकरुन नवी मुंबईची वाहतुक कोंडीची समस्या व विकासकामांतील अडसर दूर होईल, अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी केली आहे. यावर निश्चितच सकारात्मक विचार करु, अशी ग्वाही आयुक्त मदान यांनी आमदार नाईक यांना दिली आहे.