सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : एकीकडे नवी मुंबई महापालिका प्रशासन स्वच्छता सर्वेक्षणामध्ये देशामध्ये प्रथम क्रमाकांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच दुसरीकडे नेरूळ सेक्टर सहामधील सागरदीप सोसायटीच्या रहीवाशांनी सोसायटी आवारात स्वच्छता अभियान राबवून पालिकेच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये ६४ सदनिकांची बी टाईपची सागरदीप सोसायटी आहे. महापालिकेच्या स्वच्छतेच्या आवाहानाला प्रतिसाद देताना सागरदीप सोसायटीच्या रहीवाशांनी रविवारी सोसायटी आवारात स्वच्छता अभियान राबविताना रविवारचा दिवस सत्कारणी लावला. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर तसेच सोसायटीच्या अर्ंतगत भागातही स्वच्छता सर्वेक्षणाचे विविध बॅनर लावून सोसायटीतील रहीवाशांची स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
स्वच्छता अभियानात सोसायटीतील रहीवाशांपासून ते लहान मुले सहभागी झाली होती. सुमारे दोन तास हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये सोसायटी आवारातील पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली. रहीवाशांनी व मुलांनी टी शर्ट परिधान करताना त्यावर मागील बाजूस सोसायटीचे नाव आणि प्रबोधनात्मक संदेश होते. स्वच्छता अभियान राबविणार्या सागरदीप सोसायटीच्या उपक्रमाची दिवसभर सर्वत्र प्रशंसा होत होती.