सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- महाशिवरात्रीनिमित्त पामबीच मार्गालगत असलेल्या सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात दरवर्षी सारसोळेचे ग्रामस्थ बामणदेवाचा भंडारा आयोजित करतात. भक्तांच्या हाकेला धावून जाणारा व नवसाला पावणारा अशी या बामणदेवाची ख्याती असल्याने हजारोच्या संख्येने भाविक या बामणदेवाच्या भंडार्यात सहभागी होत असतात.
यंदाचे बामणदेव भंडार्याचे १३वे वर्ष असून गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून सारसोळेचे ग्रामस्थ या भंडार्याचे आयोजन करत असतात. सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात बामनदेवाचे मंदिर असून सारसोळेचे ग्रामस्थ पिढ्यान्पिढ्या या बामणदेवाची पूजा करतात. खाडीत मासेमारी करावयास गेल्यास नैसर्गिक संकटांपासून बामणदेवच आपले रक्षण करतो अशी सारसोळेच्या ग्रामस्थांची श्रध्दा आहे. बामणदेव हा शंकराचा अवतार असल्याने महाशिवरात्रीनिमित्त सारसोळेचे ग्रामस्थ खाडीअर्ंतगत भागात बामणदेवाचा भंडारा आयोजित करत असतात.
बामणदेवाकडे जाणारा मार्ग आजही कच्चाच असल्याने दरवर्षी सारसोळेचे ग्रामस्थ कोलवानी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून भंडार्यापूर्वी या मार्गाची सफाई करतात. यंदाच्या वर्षी कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांच्या संकल्पनेतून वनविभाग, महापालिका प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून बामणदेव मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि लोकसहभागातून या मार्गाची स्वच्छता करण्यात आली.
१३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या बामणदेवाच्या भंडार्यामध्ये नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने भक्तिभावाने सहभागी होवून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनोज यशवंत मेहेर यांनी केले आहे.