दिपक देशमुख
नवी मुंबई :- नेरूळ सेक्टर चार येथील पालिकेच्या उद्यानामध्ये बसविण्यात आलेल्या खेळण्यातील एक लोखंडी भाग तुटल्याने खेळताना हा तुटलेला भाग लक्षात न आल्यामुळे उद्यानात खेळण्यास आलेल्या मुलांना दुखापती होण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे नेरूळ विभाग कार्यालयासमोरच हे उद्यान असतानाही तुटलेल्या खेळण्याची डागडूजी करण्याचे स्वारस्यही पालिका प्रशासनाकडून दाखविले जात नाही.
नेरूळ सेक्टर चार हा वाधवा टॉवरचा अपवाद वगळता पूर्णपणे सिडको वसाहतीचा परिसर आहे. सिडको वसाहतीचा परिसर असला तरी हा परिसर उच्चभ्रूंचा परिसर म्हणून ओळखला जातो.या उद्यानात सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यत आपणास गर्दी पहावयास मिळते. सकाळी मॉर्निग वॉकला परिसरातील रहीवाशी मोठ्या संख्येने येतात. दुपारपासून ते सांयकाळपर्यत या उद्यानात प्रेमी युगुले बसलेली पहावयास मिळतात. रात्री जेवण झाल्यावर शतपावली करायला अथवा थोडा वेळ विसावा घ्यायला रहीवाशी उद्यानात येतात. या परिसरात हे महापालिकेचे एकमेव उद्यान असून रहीवाशांसोबत लहान मुलेही उद्यानात खेळण्यासाठी येतात. या उद्यानात बसविलेल्या खेळण्याचा एका दिशेकडील भाग गेल्या काही महिन्यापासून तुटलेला असून त्या खेळण्याची डागडूजी करण्यासाठी स्थानिक नगरसेवक व पालिका प्रशासनही कानाडोळा करत असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे. खेळताना मुलांच्या लक्षात न आल्याने मुले पळताना लोखंडी गोलाकार रॉडवर पाय ठेवायला गेल्यावर तो लोखंडी गोलाकार तुटलेला रॉड नंतर लक्षात येतो. तोपर्यत मुले खेळण्यातून पडलेली असतात. या तुटलेल्या लोखंडी रॉडमुळे अनेक मुलांना जखमाही झाल्याची माहिती यावेळी उद्यानातील रहीवाशांकडून देण्यात आली.