मार्को लाईन कंपनीवर व संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईची करण्याची मागणी
दिपक देशमुख
नवी मुंबई :- शहराचा नेकलेस क्वीन म्हणून समजल्या जाणाऱ्या पामबीज मार्गावर प्रशासनाकडून करोडो रुपये खर्च करून मायक्रो सर्फेसिंग द्वारे रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले. या कामाची मोठ्या प्रमाणात स्तुती करण्यात येत असतांनाच त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे मानव सेवा संस्थचे अध्यक्ष योगेश महाजन यांनी माहितीच्या अधिकारात उघडकीस आणले आहे.चांगला रस्ता खराब दाखवुन त्या द्वारे प्रशासनाने आपले हित साधले असल्याचा आरोप योगेश महाजन यांनी केला आहे.या प्रकरणी झालेल्या कामाची चौकशी करत कंत्राट दाराची पुढील बिलाची रक्कम थांबवण्यात यावी अशी मागणी महाजन यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पामबीज मार्गावर २० डिसेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत प्रशासनाकडून डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे.हे काम पैश्याची बचत करता यावी यासाठी प्रशासनाकडून मार्क-ओ लाईन या कंपनीला देण्यात आले.या कंपनीने नवीन पद्धतीनेच्या आधारे डांबरीकरणाचे काम केल्याने ४० करोड रुपयांचे काम फक्त ७ करोड रुपयांत झाले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.त्याच वेळी रस्त्याच्या कामाचा दर्जा बघितला असता त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा संशय महाजन यांना आला.त्यामुळे त्यांनी सदरच्या कामाची माहिती माहितीच्या अधिकारा अंतर्गत मागितली. सदर माहिती हाती आली असता प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला. पारंपारीक पद्धतीने सदरील कामाचा खर्च १५ करोड अपेक्षित होता असे शहर अभियंता विभागाच्याच अभियंत्यानी बनवलेल्या अंदाज पत्रकात दिसते, हे माहीतीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट होत असतांना शहर अभियंता यांनी कोणत्या आधारे ४० करोडोंचा खर्च अपेक्षित होता असे जाहीर केले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. झालेल्या कामाची शहनिशा न करता काम उत्तम प्रकारे झाले आहे याची घाई का करण्यात आली असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.मार्को लाईन या कंपनीला कामाचा अनुभव नसतांना त्यांना काम कसे देण्यात आले,या कंपनीने आता पर्यंत एकाच ठिकाणी सब कंत्राट दार म्हणून काम केले असता त्यांना कोणत्याही सरकारी कामाचा अनुभव नसतांना देखील सदरील कंपनीला कोणत्या आधारे काम देण्यात आले असाही प्रश्न उपस्थित होत आहे.जे काम या कंपनीला देण्यात आले आहे त्या कामाचा दोषावरण कालावधी ५ वर्षाचा आहे.असे असतांना काम होऊन काही महिने उलटत नाही तोच या रस्त्यावर खड्डे पडल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे सदरील कंत्राट दाराची बिलाची रक्कम थांबवण्यात यावी अशी मागणी मानव सेवा संस्थचे अध्यक्ष योगेश महाजन यांनी प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.तर झालेल्या कामाची चौकशी करून सदरील कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.