जालना येथे काँग्रेस पक्षाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर संपन्न
जालना : राजकीय स्वार्थासाठी समाजात जातीवादाचे विष पेरण्याचे काम काही संघटना करित आहेत. राजकीय फायद्यासाठी सरकारकडून या प्रवृत्तींना पाठिंबा मिळत आहे. समाजिक ऐक्य टिकविण्यासाठी काँग्रेसचा विचार तळागाळापर्यत पोहोचवून या प्रवृत्तींना रोखण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
जालना येथे आज काँग्रेस पक्षाचे जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडले यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर या देशात लोकशाही रूजवून देश घडविण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. विद्यमान सरकारने गेल्या चार वर्षात कोणतेही काम केले नाही. जनतेमध्ये सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. या सरकारच्या काळात शेतक-यांनी संप केला. महिला, तरूण, विद्यार्थी, कामगार, नोकरदार, दलित, अल्पसंख्यांक कामगार, शेतकरी, समाजातील एकही घटक या सरकारच्या कामावर समाधानी नाही. लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत लोकं आपल्याला मते देणार नाहीत हे कळून चुकल्याने समाजात जातीय विष पेरून राजकीय फायदा उचलण्याचा सत्ताधा-यांचा डाव असून भीमा कोरेगावचे प्रकरण याचे उदाहरण आहे. काँग्रेसचा विचार ताळागाळापर्यंत पोहोचवून लोकांमध्ये जागृती करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडावेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही. ज्यांनी इंग्रजांची गुलामगिरी केली ते आज आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवत असून तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यास विरोध करणारे आज तिरंगा यात्रा काढत आहेत हा भाजपचा ढोंगीपणा आहे असे मोहन प्रकाश म्हणाले. भाजपच्या सत्ताकाळात काळात पेट्रोल,डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या किंमती वाढवून सर्वसामान्यांची लूट सुरु आहे. गरिब, दलित,आदिवासी, अल्पसंख्यांक, महिलांना काँग्रेसने दिलेले माहितीचा अधिकार, रोजगाराचा अधिकार, अन्न सुरक्षा,माहिती, शिक्षणाचा अधिकार असे अधिकार भाजप सरकारने काढून घेतले आहेत. जनतेत भाजपाविरोधात तीव्र संताप असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात परिवर्तनासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या शिबिराला मार्गदर्शन करताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा पंचनामा केला. ते म्हणाले की, भाजपने लोकांचा अपेक्षाभंग केला असून सर्वसामान्यांना न्याय काँग्रेसपक्षच देऊ शकतो अशी सार्वत्रीक भावना निर्माण झाली आहे. लोकांच्या या अपेक्षेच्या कसोटीवर खरे उतरण्याची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न घेऊन सरकारविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, वसंत पुरके, खा. राजीव सातव,हुसेन दलवाई, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, नाना पटोले, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे माजी आमदार व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जेथलिया महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांची शिबिराला मार्गदर्शन केले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळ यांनी सादरीकरण केले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर राजेंद्र राख आभार मानले.
यावेळी विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
या शिबिराला ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शंकरराव राख, रामप्रसाद बोराडे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे,माजी आ. कैलाश गोरंट्याल, धोंडीराम राठोड, संतोष दसपुते, माजी जि. प. अध्यक्ष ज्ञानदेव बांगर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हरिष रोग्ये, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, सचिव आबा दळवी, शाह आलम, सत्संग मुंडे, राजेश राठोड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश प्रतिनिधी राजेंद्र राख, जालना लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर सत्तार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.