आमदार मंदाताई म्हात्रे यांची चालू अर्थसंकल्पिय वर्षात निधीची मागणी
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :– वाशी नवी मुंबई येथे राज्यनिहाय प्रत्येक राज्याची भवने उभी असून सिडकोने “महाराष्ट्र भवन” करीता भूखंड उपलब्ध केला असतानाही सदर महाराष्ट्र भवनचे बांधकाम निधीअभावी आजतागायत सुरू करण्यात आलेले नाही. नवी मुंबईत सुसज्ज अशी महाराष्ट्र भवनची वास्तु उभी राहावी याकरिता विधानमंडळाच्या चालू अर्थसंकल्पिय वर्षात महाराष्ट्र भवन उभारणीकरिता निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांजकडे केली.
नवी मुंबई शहर उभारताना सिडकोमार्फत सर्व राज्यसंस्कृती समभाव धारणा जपत वाशी येथील सेक्टर नं. 30 ए, येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. राज्यनिहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी असून “महाराष्ट्र भवन” उभारणेसाठीही 8000 स्केव.मी. भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु 1998 पासून ते आजतागायत सदर भूखंडावर “महाराष्ट्र भवन” निर्मितीसाठी एकही वीट रचण्यात आलेली नाही. ज्याची ह्या राज्याची नागरिक म्हणून नवी मुंबईकरांसमवेत मलाही व्यक्तिगत खंत असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोंकण अशा विविध ठिकाणांहून नागरिक तसेच लोक प्रतिनिधी, अधिकारी कामांनिमित्त मुंबई येथे येत असून त्यांना विसावा करण्याकरिता मुंबईच्या जवळपास महाराष्ट्र भवनची निर्मिती होणे गरजेचे आहे. सिडकोने “महाराष्ट्र भवन” करिता 8000 स्क्वे.मी. चा भूखंड उपलब्ध करून दिला आहे, परंतु निधी अभावी सदर महाराष्ट्र भवनचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. सदर महाराष्ट्र भवनच्या बांधकामाकरिता येत्या चालू अर्थसंकल्पिय 2018 या वर्षात निधी उपलब्ध झाल्यास सुसज्ज असे “महाराष्ट्र भवन” ची वास्तू नवी मुंबई येथे उभी राहील. याकरिता विधी मंडळाच्या चालू अर्थ संकल्पिय 2018 या वर्षात महाराष्ट्र भवन उभारणेकरिता निधीची तरतूद करण्याची मागणी आपण केली असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.