नितेश राणेंच्या उपस्थितीत सिंधुदुर्गावर पुन्हा साजरा होणार शिवजयंती उत्सव
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
मुंबई: छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांपैकी सिंधुदूर्ग किल्ला म्हणजे मराठा आरमाराची राजधानी आणि शिवरायांचा आवडता दुर्ग. अशा या सिंधुदुर्गावर यावर्षापासून पुन्हा शिवजयंती उत्सव तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरूवात होत आहे. स्थानिक आमदार नितेश राणे आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती उत्सव पार पडणार आहे. यावेळी शिवरायांच्या हस्तचिन्हाच्या तसेच पदचिन्हाच्या मुळ ठशांची हुबेहूब प्रतिकृती आणि शिवराजेश्वर मुर्तीची धातूची प्रतिकृती सिंधुदुर्गावर अर्पण करण्यात येणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवछत्रपती जन्मोत्सव समिती (सिंधुदुर्ग किल्ला) यांच्या विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अठरा टोपीकरांच्या डोक्यावर बसलेली शिवलंका म्हणजे सिंधुदुर्ग. शिवपुत्र राजाराम महाराजांनी याच दुर्गावर शिवरायांचे स्मृतीमंदिर बांधले. या स्मृतीमंदिरात शिवरायांची पाषणातील शिवराजेश्वर मुर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या वेळेपासून स्वत: शिवरायच या दुर्गावर विराजमान आहेत, असे समजले जाते. शिवकाळापासून सिंधुदुर्गावर शिवजयंती साजरी होत होती. पुढे रायगड जेव्हा मोगलांच्या ताब्यात गेला, तेव्हाही सिंधुदुर्गावरील या शिवजयंती उत्सवात खंड पडला नव्हता. मात्र त्यानंतर खंडीत झालेली ही परंपरा पुन्हा सुरू करत या वर्षीपासून पुन्हा एकदा सिंधुदुर्गावर शिवजयंती उत्सवाला सुरूवात केली जात आहे. सिंधुदुर्गावर पुन्हा एकदा शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा होत आहे. सिंधू सागराच्या उधाणलेल्या लाटा आणि शिवशक्तांच्या सागराच्या साक्षीने आपल्या लाडक्या दैवताला म्हणजेच शिवरायांना मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त जमणार आहेत.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या जलदुर्गाच्या तटबंदीवर शिवरायांच्या हातापायाचे ठसेही जपून ठेवले आहेत. शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या हस्तचिन्हाची प्रतिकृती तयार करून घेतली होती. जुन्या राजवाड्याच्या देवघरामध्ये त्याची मुळ प्रतिकृती आहे. या हस्तचिन्हाच्या तसेच शिवरायांच्या पदचिन्हाच्या मुळ ठशांच्या हुबेहूब प्रतिकृती शिवजयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्गावर अर्पण करण्यात येणार आहेत. त्या सोबतच महाराजांचे टोप आणि वस्त्र प्रावरणेसुद्धा यावेळी अर्पण करण्यात येणार आहेत. याशिवाय सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या मुळ पाषाण मुर्तीची झीज होऊ नये म्हणून धातूची मुर्तीही या मंगलसमयी अर्पण करण्यात येणार आहे.