नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन
दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई :- मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या वेगाने पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत, ते पाहता 2022 पर्यंत मोठा विकास झालेला आपण पाहाल, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीची प्रशंसा केली. हवाई वाहतूक आणि जल वाहतूक क्षेत्रातही झपाट्याने विकास होत असून यामुळे देशाला जागतिकीकरणाचा खरा लाभ मिळेल. मुंबईमधील जल, भूमि आणि आकाश अशा ठिकाणी सुरु असलेल्या विविध कामांमुळे खऱ्या अर्थाने विकास होईल, त्याचप्रमाणे शिवरायांचे प्रेरणा देणारे स्मारक देखील समुद्रात उभे राहिलेले असेल, असेही ते म्हणाले.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्टच्या चवथ्या कंटेनर टर्मिनलचे लोकार्पण इलेक्ट्रॉनिक पध्दतीने कळ दाबून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उलवे गावाजवळील कोंबडभुजे येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य मैदानावर आयोजित या शानदार सोहळ्यास राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग, नौकानयन व जलस्त्रोत मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री पी. अशोक गजपथी राजू, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ.प्रशांत ठाकूर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतांना प्रधानमंत्री मोदी म्हणाले की “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या या रायगड भूमीमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, या स्वराज्य भूमीला माझा प्रणाम”. छत्रपती शिवरायांची जयंतीच्या आदल्या दिवशी जेएनपीटीच्या चवथ्या टर्मिनलचे उद्घाटन आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपुजन अशा दोन संधी मिळणे हा चांगला योगायोग आहे. सागरी शक्तींचे महत्व ओळखणारे छत्रपती शिवराय हे पहिले राष्ट्रपुरुष होते. ते किती दूरदृष्टी असलेले होते याची कल्पना आज जेव्हा आम्ही सागरी शक्तींमध्ये वाढ करीत आहोत तेव्हा लक्षात येते.
आज देशाला लाभलेल्या 7 हजार 500 कि.मी. सागरी किनाऱ्याचा सर्वांगिण विकास करून सागरी शक्ती वाढविण्यासाठी आम्ही महत्वपूर्ण पाऊले उचललेली आहेत असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले की , 100 हून अधिक जलमार्गाचे नियोजन आम्ही केले आहे.
नवी मुंबईत उभारण्यात येणारे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वातंत्र्यानंतरचे पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ असेल. अनेक सरकारे आली पण एअरपोर्टचे स्वप्न तसेच राहीले होते. 1997 मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात त्या ठिकाणी विमानतळ व्हावे अशी कल्पना पुढे आली होती. मी प्रधानमंत्री झाल्यावर देशातील महत्वपूर्ण पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी “प्रगती”नावाचा एक कार्यक्रम सुरु केला. त्यामार्फत राज्यांतील सचिवांशी थेट चर्चा करून येणाऱ्या अडचणी सोडविल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख करुन प्रधानमंत्री म्हणाले की, अशाच एका व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाचे काम विविध परवानग्याअभावी थांबले असल्याचे सांगितले. आम्ही तात्काळ त्याचवेळी सर्व आवश्यक परवानग्या दिल्या. 10 लाख कोटी रुपयांचे विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले असून त्यात हाही एक प्रकल्प होता.
मुंबईमधील जल, भूमि आणि आकाश अशा ठिकाणी सुरु असलेल्या विविध कामांमुळे खऱ्या अर्थाने विकास होईल, त्याचप्रमाणे शिवरायांचे प्रेरणा देणारे स्मारक देखील समुद्रात उभे राहिलेले असेल, असे प्रधानमंत्र्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
देशात हवाई वाहतूकीचे धोरण नव्हते ते आम्ही तयार केले. हवाई चप्पल घालणारा सर्वसामान्य माणूस देखील विमानाने प्रवास करू शकला पाहिजे त्यादृष्टीने आम्ही उडान योजनेअंतर्गत 100 हून जास्त विमानतळ कार्यरत करीत असून उत्तर पूर्व भागासारखे छोटे छोटे भाग हवाई वाहतूकीने जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. देशात स्वातंत्र्यानंतर सरकारी/खासगी अशी केवळ 450 विमाने होती. गेल्या वर्षभरात आमच्या धोरणामुळे 900 नवी विमाने खरेदी करण्यात येत आहेत. असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले की, या सर्वांमागे पर्यटन आणि मालवाहतुकीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याची आमची भुमिका आहे. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
विमानतळ विकासामुळे राज्याचा विकासदर वाढेल- मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, 2019 च्या डिसेंबरपर्यंत या विमानतळाचा एक टर्मिनल व एक धावपट्टी तयार होऊन यावरून पहिले विमान उडेल. महाराष्ट्र आणि मुंबईच्या जीडीपीमध्ये या विमानतळ विकासामुळे निश्चितपणे एक टक्क्याने वाढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.या विमानतळासाठी 98 टक्क्यांहून अधिक जमीन शेतकऱ्यांनी स्वत:हून दिली असून देशातील सर्वोत्तम पॅकेज आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे.
या विमानतळासाठी त्याग केलेल्या त्याचप्रमाणे या कामी समन्वयाची भुमिका घेतलेल्या दि.बा.पाटील, रामशेठ ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला. त्याप्रमाणे सिडकोचे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया आणि विद्यमान व्यवस्थापकीय संचालक भुषण गगराणी यांचेही त्यांनी भाषणत कौतूक केले. 2015 पर्यंत या विमानतळाच्या आठ परवानग्या बाकी होत्या. प्रधानमंत्र्यांच्या केवळ एका व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये या परवानग्या आम्हाला मिळाल्या. नागरी हवाई वाहतुक विभागाने देखील यामध्ये मोठे सहकार्य केल्यामुळे आज 6 कोटी प्रवाशांची वाहतूक करू शकणारा हा देशातील पहिला ग्रीन फिल्ड विमानतळ उभा राहत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईच्या लोकल रेल्वे विकासासाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
याप्रसंगी केंद्रीय नागरी हवाई मंत्री अशोक गजपती राजू यांनी आपल्या प्रस्तावनेत हवाई वाहतूक क्षेत्रात सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र शासन हे पहिले राज्य असल्याचे सांगून कौतूक केले.
बंदर विकासामुळे भुमिपुत्रांना नोकऱ्या- गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सागरमाला प्रकल्पामुळे कोकणातील मच्छिमारांना मोठा फायदा होणार असून ते आता ट्रॉलर्समुळे खोल समुद्रात 200 नॉटीकल इतक्या अंतरावर मासेमारी करू शकतील. मुंबईमध्ये पुढील काळात 950 क्रुज येणार असून त्यामुळे रोजगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. रायगड आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यातील युवकांना नौकाबांधणी आणि सागरी क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत असून सव्वा लाख भूमीपुत्रांना त्यातून नोकऱ्या उपलब्ध होतील. नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले की, माल वाहतुकीला चालना देण्यासाठी मनमाड ते इंदोर या रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी जेएनपीटीने 6 हजार कोटी गुंतवणूक केली आहे. तसेच जालना, वर्धा येथे ड्राय पोर्ट उभारणी सुरु असुन नाशिक व सांगली येथे लवकरच कार्यान्वित केले जाईल. नवी मुंबईतील कंटेनर वाहतूक कमी करण्यासाठी बीपीटी येथे कंटेनरसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले. कोकणात मासेमारी अधिक विकसित करण्यासाठी विविध बंदरांचा लवकरच विकास होऊन मच्छिमारांसाठी सुविधा निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयी
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी रु. 16 हजार कोटी इतका खर्च असलेले विमानतळ विकसित करण्यासाठी स्थापन झाली आहे. सिडको आणि राज्य शासन हे एनएमआयएएलचे भागीदार आहेत. एकूण 2268 हेक्टरवर उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे गाभा क्षेत्र 1161 हेक्टर इतके आहे. स्वातंत्र्यानंतरचे भारतातील सर्वांत मोठे ‘ग्रीनफिल्ड’ विमानतळ असा लौकिक असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रति वर्ष 60 दशलक्ष प्रवासी संख्या हाताळू शकेल.
जेएनपीटी टर्मिनलविषयी
सदर विमानतळ प्रकल्पामुळे 10 गावांतील सुमारे 3500 कुटुंबांचे, स्थानिक उद्योगांचे व बांधकामांचे स्थानांतरण करावे लागणार आहे. प्रकल्पबाधित ग्रामस्थांना ‘भूमी, अधिग्रहण, पुनर्वसन व पुन:स्थापना, पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा-2013’ नुसार पुनर्रसन व पुन:स्थापनेचे सर्वोत्तम पॅकेज देण्यात आले आहे.
चिंचपाडा (दिघोडेपाडा), कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा, चिंचपाडा (तलावपाळी), चिंचपाडा (मोठा पाडा), चिंचपाडा (मधला पाडा), वरचे ओवळे, तरघर, कोंबडभुजे व गणेशपुरी या गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. प्रकल्पबाधितांच्या पाल्यांना रोजगारपूरक असे प्रशिक्षण दिले जाईल.
जेएनपीटी चवथे टर्मिनल- एकाच वेळी तीन कंटेनर जहाजे हाताळण्याची सुविधा,भारतातील एकमेव ऑन डेक डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर पूर्तता सुविधा, सात हजार 915 कोटी रुपयांची गुंतवणूक, डबल स्टेकिंगसह दिड कि.मी लांबीची 360 टीईयू कंटेनर ट्रेन्स हाताळण्याची क्षमता, मोठ्या कंटेनर व्हेसल्स हाताळण्यासाठी 22 रो रुंद आऊटरिच मोठ्या क्रेन्स, सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रातील बंदरांवर आधारीत औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल.2022 पर्यंत तीन टप्पे पूर्ण होणार.
चवथ्या कंटेनर टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला 24 लाख कंटेनर हाताळण्याची क्षमता निर्माण होणार. टप्पा 1 व टप्पा 2 च्या पुर्ततेनंतर वर्षाला 100 लाख कंटेनर हाताळण्याची क्षमता निर्माण करण्याचे नियोजन.
सागरमाला प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रात 2.5 लक्ष कोटी रुपयांहून अधिक रकमेचे 101 प्रकल्प करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील 5 प्रकल्प पूर्ण झाले असून 58 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
—————-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवी मुंबई येथे स्वागत
नवी मुंबई,दि.18- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमिपूजन समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज कोंबडभुजे, नवी मुंबई येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील,नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, आ.मंदा म्हात्रे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.