शेकापही कडू यांच्या कार्यपद्धतीवर बेहद खुश !
पनवेल : निवडणुक पूर्व तयारीला राज्यातील विविध राजकीय पक्षांनी सुरुवात केली असताना, पनवेलच्या संभाव्य विधानसभा निवडणुकीकरिता वेगळी आघाडी उदयास येणार असल्याचे आज संकेत मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावणार आहेत. पत्रकार कांतीलाल कडू यांना विधानसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने पाठिंबा घोषित केला तर शेकापने कडू यांची कार्यपद्धती समाजाभिमुख असल्याचे सांगत कौतुक केले.
कांतीलाल कडू यांच्या पत्रकारितेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात राजकीय घडामोडींना उधाण आले होते. कडू यांनी सत्काराला उत्तर देताना आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे घोषित केले तेव्हा अनेकांची झोप उडाली. आता विजयानंतर कायमची उडेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला तो धागा पकडून शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी कांतीलाल कडू आमदार होणे काळाची गरज असून पक्षांचा पाठिंबा घोषित करून राजकीय खळबळ माजवली. शेकापचे नेते, माजी आमदार विवेक पाटील यांनी, आपण कडू यांच्या राजकीय वक्त्यव्याला टाळणारही नाही आणि बोलणारही नाही अशी गुगली टाकत सावध भूमिका घेतली. मात्र, त्यांचे सामाजिक योगदान वाखाण्याजोगे आहे. त्यांची सांस्कृतिक चळवळ आणि सामाजिक कामांतून समाजाला न्याय देण्याची कार्यपध्दती कौतुकास्पद असल्याचे सांगत दोन्ही पाटलांच्या सुरात सूर मिसळला. त्यामुळे वेगळी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे कडू यांना आशीर्वाद लाभले आहेत, म्हणून कांतीलाल कडू यांचा अश्वमेघ चौफेर फिरत असल्याचे विवेक पाटील यांनी सांगितले, तो धागा पकडून पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की, कडू हे माझे मित्र आहेत, लहान भाऊ आहेत. त्यांना माझ्या आशीर्वादापेक्षा भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांचे आशीर्वाद लाभले आहेत. दीदीने प्रत्यक्ष, फोनवरून आणि लेखी पत्राद्वारे आशीर्वाद दिले आहेत, असे सांगताच कामोठे येथे विजा चमकाव्यात तशा टाळ्या पडल्या. त्यामुळे सांस्कृतिक व्यासपीठावर आज राजकीय चर्चेला ऊत आला होता. त्यातच महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या बदलीचा समाचार घेताना सर्वच वक्ते भाजपा नेत्यांवर तुटून पडल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकी वेगळी आघाडी उदयास येत असल्याचे आज चित्र स्पष्ट झाले.
मत विकणे आणि विकत घेणे या गैरप्रथेला छेद देण्यासाठी यापुढे जनजागृती करण्याचा संकल्प कडू यांनी व्यक्त केला. पैसे देवून मतं विकत घेतली जात असल्याने दोन पिढ्यांचे नुकसान आणि विकास खुंटला जात असल्याने आता लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला हातात हात घालून काम करायचे आहे असे सांगितले.
व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, ज्येष्ठ नेते सूरदास गोवारी, सामाजिक कार्यकर्ते पदाजीशेठ ठाकुर, डॉ. सी. के. ठाकुर उपस्थित होते.
या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यावतीने सहाय्यक आयुक्त भगवान खाडे यांनी, तृप्ती पाटील, प्रा. एल. बी. पाटील, अरुणबुवा कारेकर आदिंनी पुरस्कार स्वीकारले. जिल्ह्यातील मान्यवर पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
त्यानंतर झालेल्या भाव सरगम सांस्कृतिक मैफलीला प्रचंड प्रतिसाद लाभला, चार तासांहून अधिक काळ ही मैफिल रंगली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्नाळाचे संपादक मंदार दोंदे यांनी केले.