मुंबई : राज्यात गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आलेल्या ओखी चक्री वादळामुळे शेती फळपिकांचे तसेच कोकण विभागात मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले होते. नाशिक व कोकण विभागातील 8 हजार 45 नुकसानग्रस्तांना 6 कोटी 2 लाख 43 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून या संदर्भातील निधीचे वितरण नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांना करण्यात आले आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
दि. 4 ते 6 डिसेंबर 2017 या कालावधीमध्ये आलेल्या ओखी चक्री वादळामुळे शेतकरी तसेच मच्छिमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होत. नुकसानग्रस्तांना राज्य आपत्ती मदत निधीच्या निकषानुसार शेतीपिके व फळपिके नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच मच्छिमार बोटी व जाळींच्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या दोन्ही विभागीतील नुकसानग्रस्तांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. निधी नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात थेट जमा करावा. त्याचबरोबर या मदतीच्या रकमेमधून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दिले आहेत.
नाशिक विभागामध्ये 1 हजार 523 शेतकरी बांधवांना ओखी चक्री वादळामुळे नुकसान झाले असून त्यासाठी 2 कोटी 37 लाख 37 हजार रुपयांचा मदत निधी नाशिक विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. कोकण विभागात 6 हजार 525 नुकसानग्रस्तांना 3 कोटी 65 लाख 6 हजार रुपयांचा निधी कोकण विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे.
मच्छिमार बोटी व जाळीच्या नुकसानीसाठी मदत करताना बोट, होडी, यांत्रिकी बोट यांच्या अंशत: दुरुस्तीसाठी 4 हजार 100 रुपये मदतीचा दर आहे. तर पूर्णत: नष्ट झालेल्या बोट, होडी, यांत्रिकी बोटीसाठी 9 हजार 600 रुपये, अंशत: बाधित झालेल्या जाळ्यासाठी 2 हजार 100 रुपये आणि पूर्णत: नष्ट जाळ्यासाठी 2हजार 600 रुपये मदतीचा दर देण्यात आला आहे.
शेतीपिकांच्या तसेच बहूवार्षिक पिकांच्या नुकसानीच्या मदतीसाठी निकष 2 हेक्टरपर्यंत जमीन धारक शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी 6 हजार 800 प्रती हेक्टर पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत. मदतीची किमान रक्कम एक हजार पेक्षा कमी असणार नाही. बागायत क्षेत्रासाठी 13 हजार 500 रुपये प्रती हेक्टर पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत मदतीची किमान रक्कम एक हजार पेक्षा कमी असणार नाही. बहुवार्षिक पिकांसाठी 18 हजार प्रती हेक्टर प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत मदत2 हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही.
दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन धारक शेतकऱ्यांसाठी मदतीचे निकष असे : कोरडवाहूक्षेत्र- 6 हजार 800 प्रती हेक्टर. पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत व अधिकतम2 हेक्टरच्या मर्यादेत. बागायत क्षेत्र-13 हजार 500 रुपये पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत व अधिकतम 2 हेक्टरच्या मर्यादेत. बहुवार्षिक पिके-18 हजार रुपये प्रती हेक्टर पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत व अधिकतम 2 हेक्टरच्या मर्यादेत. शेती व फळपिकांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना ही मदत अनुज्ञेय राहील, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.