सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नुकत्याच स्थायी समितीला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महापालिकेच्या सुमारे २००० कोटी रूपयांच्या ठेवी असल्याचे स्पष्ट झाले. परंतु कोट्यवधी रूपयांच्या ठेवी असणार्या महापालिका प्रशासनाचा मुषक नियत्रंण कामगारांच्या वेतनाबाबत ‘तुघलकी’ कारभार कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुषक नियत्रंण विभागात सुमारे ५० कामगार ‘मनी’ या ठेकेदारांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. परंतु हा ठेकेदार असलेला मनी नामक इसम मुषक नियत्रंण कामगारांना पगाराचे ‘मनी’ वेळेवर देत नसल्याने या कामगारांची आर्थिक ससेहोलपट होत आहे. दोन ते तीन , कधी चार महिने या कामगारांना पगारापासून वंचित राहावे लागत आहे. मूषक नियत्रंण कामगारांच्या वेतन विलंबाबाबत कामगार संघटना, नगरसेवक आणि सामाजिक संस्थाही उदासिनता दाखवित असल्याने या कामगारांना महापालिका प्रशासनात वाली नसल्याचे चित्र नेहमीच पहावयास मिळत आहे.
फेब्रुवारी महिना संपत आला असला तरी या मूषक नियत्रंण कामगारांना जानेवारी महिन्याचे वेतन अजून मिळालेले नाही. डिसेंबर महिन्याचे वेतन मिळाले असले तरी नोव्हेंबर महिन्याच्या वेतनातील २८०० रूपये अजून अधिकांश कामगारांना ठेकेदारांने दिले नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
मूषक नियत्रंणचा नव्याने ठेका काढण्यात आला असून या कामासाठी १३ कंपन्यांनी निविदा भरल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. ठेका कोणत्याही कंपनीला द्या, पण आमचा पगार वेळेवर करा अशी मागणी मूषक नियत्रंणच्या कामगारांकडून करण्यात येत आहे.