दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबईतील मुले, युवक, महिला, प्रौढ, ज्येष्ठ अशा सर्वच घटकांतील नागरिकांच्या अंगभूत गुणांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचे काम महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जात असून वयाच्या चाळीशीनंतर क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याचे संवर्धन करणा-या खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी आयोजित केल्या जाणा-या फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेला प्रत्येक वर्षी मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आनंद होतो अशा शब्दात नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या क्रीडांगणात 24 व 25 फेब्रुवारी रोजी आयोजित नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभानिमित्त ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. नवी मुंबईतील खेळाडूंना चांगली मैदाने खेळण्यासाठी उपलब्ध व्हावीत यादृष्टीने मैदान व्हिजन हाती घेण्यात येईल तसेच गावांमधील मैदानांबाबतही विकास आराखड्यात नियोजन करण्यात येईल असे महापौरांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, परिवहन समिती सभापती श्री. प्रदीप गवस, स्पर्धा निमंत्रक तथा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री.विशाल डोळस, आरोग्य समितीच्या सभापती श्रीम. उषा भोईर, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या सभापती श्रीम. अनिता मानवतकर, नगरसेवक श्री. लिलाधर नाईक, श्री.सोमनाथ वास्कर, श्री.सुनिल पाटील, फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, 40+ असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.बाळाराम पाटील, सचिव श्री. लिलाधर पाटील, खजिनदार श्री.नरेश गौरी, कार्यकारी सदस्य श्री. विकास मोकल, वाशी विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांच्या स्वास्थ्याचे रक्षण करण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिका फोर्टी प्लस क्रिकेटला उत्तेजन देऊन करीत असल्याबद्दल कौतुक करीत आमदार श्री. संदीप नाईक यांनी नवी मुंबईत उगम झालेल्या फोर्टी प्लस क्रिकेटची गोडी आता राज्याच्या सीमा ओलांडून भारतभर पसरलेली असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या स्पर्धेत सहभागी होणा-या संघांमध्ये सतत होणारी वाढ सुखावणारी असून यापुढील काळात मैदानात आजोबा, मुलगा व नातू एकत्रित खेळताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको अशा शब्दात या संकल्पनेचे कौतुक केले. महानगरपालिकेने एकत्रित भव्यतम क्रीडा महोत्सव साजरा करून फोर्टी प्लसला नवी मुंबईचा ब्रँड म्हणून प्रसारीत करायला हवे अशी सूचना त्यांनी केली.
याप्रसंगी बोलताना क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. विशाल डोळस यांनी 40+ क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्याचा मान नवी मुंबईला असून विशेषत्वाने नवी मुंबईतील गावांमध्ये अनेक वर्षांपासून 40+ क्रिकेटची परंपरा जपली जात आहे व आता सिडको विकसित भागांमध्येही हे लोण पसरत आहे असे सांगत या स्पर्धेत तब्बल 49 संघांचा सहभागच या स्पर्धेबद्दल खेळाडूंच्या मनात असलेली आवड दाखवून देतो अशा शब्दात आपले प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले.
या नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील ग्रामीण भागातील 32 व नागरी भागातील 14 तसेच निमंत्रितांचे 3 संघ असे एकूण 49 संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकांना स्मृतीचिन्ह स्वरुपात पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज यांनाही गौरविण्यात येणार आहे.
24 व 25 फेब्रुवारी रोजी दिवसभर चालणा-या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उदया 25 फेब्रुवारी 2017 रोजी सायं.5.30 वा. नवी मुंबईचे महापौर श्री.जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून क्रिकेट प्रेमी नागरिकांनी खेळातून आरोग्य जागृती करणा-या या 40+ क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या मैदानावर मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्पर्धा निमंत्रक तथा तथा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री.विशाल डोळस आणि समिती सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे.