आयुक्तांची बदनामीही सहन करणार नाहीः पनवेल संघर्ष समितीचा निर्वाणीचा इशारा
पनवेल/प्रतिनिधी
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या सांगण्यावरून राज्य शासनाने जर का महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मुदतपूर्व बदली केली तर पनवेल महापालिका क्षेत्रासह तालुक्यात एकाही मंत्र्यांना फिरकू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिला.
आज, शनिवारी (दि. २४) येथील शासकीय विश्रामगृहात आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ पनवेल संघर्ष समितीने रणनीति ठरविण्यासाठी बैठक बोलाविली होती. त्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यावेळी हा सर्वांनुमते निर्णय घेतला. या एकमुखी निर्णयाला उपस्थितांनी हात उंचावून समर्थन दिले.
डॉ. शिंदे यांचा प्रमाद काय? याबाबत सत्ताधारी नगरसेवक, महापौर यांनी बोलावं. प्रशासन चुकत असेल तर नगरविकास खात्याकडे, राज्य शासनाकडे लेखी पुराव्यांसह सनदशीर मार्गाने तक्रार करावी. असे काहीही सत्ताधार्यांनी केले आतापर्यंत केले नाही. मग आयुक्तांविरोधात तांडव करण्याचे नेमके कारण काय, असा सवाल कडू यांनी केला. आयुक्तांनी घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाचा शुभारंभ करताना सत्ताधार्यांना काहीच वाटले नाही. असे असताना आयुक्तांमुळे विकास कामांचा खोळंबा होत असल्याचे कोणत्या तोंडाने ते सांगतात, असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला.
आयुक्तांवर भ्रष्टाचाराचे नाहक आरोप होत आहेत. ही निंदनिय घटना आहे. ते वारकरी पंथांतील आहेत. ते स्वच्छ चारित्र्याचे आहेत. त्यांच्या कुटूंबियांचे राष्ट्रीय सेवक संघाशी सौहादपूर्ण संबध आहेत. त्यामुळे ते भ्रष्टाचाराला थाराच देणार नाहीत. जर आयुक्तांचे विरोधक त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील तर मग राष्ट्रीय सेवक संघच भ्रष्टाचारी आहे, असे म्हणायला खूप वाव आहे, अशा शब्दांत कडू यांनी सत्ताधारी गटाचा समाचार घेतला.
आयुक्तांना नाहक त्रास देणार्या शकुनी मामाचे डॉ. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी चांगलेच कान उपटले होते. त्यावरून वैतागलेल्या सत्ताधारी त्याचे उट्टे काढण्यासाठी आयुक्तांची बदली करण्याचे प्रयत्न करून सूड उगारत आहेत. पनवेलच्या नागरिकांच्या अस्मितेपेक्षा सत्ताधार्यांचा आत्मप्रौढीपणा त्यांना महत्वाचा वाटतो. त्यातून ते आयुक्त आणि पनवेलकरांवर सूड उगारत आहेत, असा घणाघात कांतीलाल कडू यांनी केला.
कुठल्याही नेत्याकडे उठबस करणार नाही. आपली बदली केलीच तर रायगडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे चेरमन किंवा जेनपीटीचे अध्यक्ष म्हणून येईन, इतके लक्षात ठेवा, अशा शब्दात आयुक्त डॉ. शिंदे यांनी एका नगरसेवकाला त्यांच्या दालनात सुनावल्याने सत्ताधारी गटाचा तिळपापड झाला आहे. त्यातून त्यांनी अपमानाचा बदला घेण्यासाठी आयुक्त डॉ. शिंदे यांच्या बदलीसाठी जंगजंग पछाडले आहे, अशी माहिती कडू यांनी याप्रसंगी दिली.
प्रशासन नगरसेवकांचे ऐकत नाही, अशी हकाटी पिटली जात आहे. महापौर यांचे अस्तित्व त्यात दिसून येत नाही. गटनेत्यांनी भाड्याने चालविलेल्या कंपनीसारखे सगळे नगरसेवक, महापौर, उपमहापौर मूग गिळून गप्प आहेत. मात्र, ठाकूरशाही आता निष्प्रभ ठरत आहेत. त्यांच्या विरोधात सामान्य जनतेने आक्रोश सुरू केला आहे, हे आजच्या बैठकीतील नाराजीवरून उघड झाले.
न्यायालयीन लढाई हा मार्ग आहेच, परंतु आयुक्तांची बदली केलीच तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांना पनवेलमध्ये फिरकू देणार नाही. ते आलेच तर त्यांच्या शासकीय वाहनांसमोर आत्मदहन करण्याचा गंभीर इशाराही कडू यांनी देताच, उपस्थितांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी संघर्षचे उपाध्यक्ष विजय काळे, कल्पेश बोराडे, महेंद्र विचारे, संतोष पवार, बापू सांळुखे, आत्मराम कदम, शाहिद मुल्ला आदींनी डॉ. शिंदे यांना समर्थन देण्यासाठी विचार व्यक्त केले.
मगंल भारवाड, चंद्रकांत शिर्के, रमेश फुलोरे, बाळाराम पाटील, राजेश पाटील, पवनकुमार चौडाल, नारायण म्हात्रे, इमियाज शेख, नईम शेख, रज्जाक शेख, सुधीर धामणस्कर, रामाश्री चौहाण, शैलेंद्र साळवी, संतोष जाधव, नामदेव मोहिते, संतोष गायकर, निलेश मोरे, नासिर शेख, साहिल अन्सारी, नवाज सलीम शेख, गुरूप्रसाद गुप्ता, सुशांत सुर्वे, वसिम शेख, अनिल शितोळे, संजय शेळके आदींसह डॉ. शिंदे यांच्या शेकडो समर्थकांची उपस्थिती लाभली.
*****************
चोरांच्या हाती किल्या देवून आत्मघात करून घेवू नकाः
पनवेल महापालिका क्षेत्रात आदरयुक्त जरब बसवून शहरांना मोकळा श्वास देणार्या आयुक्त डॉ. शिंदे यांची कोणत्याही परिस्थितीत बदली होऊ द्यायची नाही. ही शाळा वाचवायची असेल तर चोरांच्या हाती चाव्या देण्यापेक्षा संतांच्या हाती दिल्यास महापालिका वाचेल. आयुक्तांना तेवढ्यासाठी प्रत्येकांनी पाठिंबा द्यावा.
– बापू साळुंखे (सामाजिक कार्यकर्ते, कामोठे)
***********************************
चोरांच्या उलट्या बोंबाः
महापालिकेत जे काही स्वार्थासाठी रणकंदण माजविले जात आहे, ते म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. आयुक्त डॉ. शिंदे हे पनवेलचे आयडॉल ठरले आहेत. त्यांची पनवेलला गरज आहे. माझ्या संस्थेचा संघर्षला पूर्ण पाठिंबा राहिल.
– शाहिद मुल्ला (सामाजिक कार्यकर्ते)
****************************************
सत्तेपेक्षा संघर्ष केव्हाही महत्वाचाः
आमचा पक्ष राज्य, केंद्रात आणि महापालिकेतही सत्तेत असला तरी जे चुकीचे आहे, त्याचे कधीही समर्थन करणार नाही. आयुक्तांनी पनवेलला शिस्त लावली आहे. त्यांची पनवेलला गरज आहे. त्यांच्या बदलीचा जर कुणी घाट घालत असेल तर आम्ही संघर्षसोबत रस्त्यावर उतरून सत्ताधार्यांना धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही.
– संतोष शरद पवार (जिल्हाध्यक्ष, लोकजनशक्ती पार्टी, रायगड)
*****************************************
सत्ताधार्यांनी आत्मपरिक्षण करावे
नगर परिषदेत ते महापालिका अशा प्रवासात सत्तेची फळे चाखणार्यांनी आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहेे. सत्तेच्या मधाचे बोट चाटत ज्यांनी पनवेलचा विकास करण्याऐवजी स्वतःचा विकास साधला त्यांनी आयुक्तांवर बोट दाखविण्यापेक्षा आत्मपरिक्षण करावे. त्याची त्यांना जास्त गरज आहे.
– आत्माराम कदम ( सामाजिक कार्यकर्ते, कळंबोली)
*************************************
कलिंगडांचा दुकाने उद्ध्वस्त केली नसती तर…!
आयुक्तांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करणार्या नेत्यांनी ध्यानात घ्यावे की, आयुक्तांनी कलिंगडांची दुकाने उद्ध्वस्त केली नसती तर त्यांच्या कंपनीला राष्ट्रीय मार्गाचे काम करणे किती अवघड झाले असते? आयुक्तांनी अतिक्रमणे हटविल्याने त्याचा फायदा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना झाला नाही का? उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांच्या वागण्याला काहीच अर्थ नाही.
-विजय काळे (उपाध्यक्ष, संघर्ष समिती)