दिपक देशमुख
नवी मुंबई :- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये जवळपास ७५० वाहनांमधून भाज्या व पालेभाज्यांची विक्रीसाठी आवक झाली. महाराष्ट्राच्या तुलनेत परराज्यातून आजही भाज्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने किरकोळ विक्रेत्यांना स्वस्त दरात भाज्या व्यापार्यांकडून विकल्या जात आहे. मात्र हेच किरकोळ विक्रेते स्थानिक बाजारात महिलांना भाज्या महाग दराने विकत असल्याने भाज्यांच्या दरातील मंदीमुळे शेतकरी व व्यापारी फारसे कमवित नसला तरी स्थानिक बाजारातील किरकोळ विक्रेते आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे नवी मुंबई, ठाणे, मुंबई व मुंबईतील उपनगरात पहावयास मिळत आहे.
राज्य सरकारने कृषी मालाच्या थेट विक्रीस परवानगी दिल्यामुळे बाजार समितीमधील भाजी मार्केटमधील अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मुंबई व मुंबईच्या उपनगरात थेट विक्रीसाठी भाज्यांची वाहने जावू लागली आहे. कल्याण, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातही ग्रामीण भागातील शेतकरी टेम्पोने भाज्या घेवून येत असल्याने ग्राहकांना थेट ताज्या भाज्या मिळू लागल्या आहेत.
बाजार समितीमधील भाजी मार्केटमधील ग्राहकांची क्षमता ३५० ते ४०० वाहनांची आहे. तथापि ८००च्या आसपास वाहनातून भाज्या येवू लागल्याने व ग्राहकही मार्केटमध्ये फारसे येत नसल्याने व्यापार्यांच्या व्यापारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. हॉटेल व्यावसायिकांना गेल्या काही महिन्यापासून पाहिजे त्या भाज्या अत्यल्प दरात प्राप्त होवू लागल्या आहे. मध्यप्रदेश, केरळ, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू यासह अन्य राज्यातील भाज्याही मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी वाशी मार्केटमध्ये येवू लागल्याने महाराष्ट्रातील भाज्यांना ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.
वाशी मार्केटमध्ये भाज्या व पालेभाज्या स्वस्तात विकल्या जात असल्या तरी किरकोळ बाजारात महिला वर्गाला भाज्या महाग दरानेच मिळत आहेत. आज वाशी मार्केटमध्ये टॉमटो ४ ते ६ रूपये किलो, वांगी १६ रूपये किलो, फ्लॉवर १२ ते १४ रूपये किलो, भेंडी २८ ते ३२ रूपये किलो, मेथी नाशिकची मोठी जुडी ५ ते ८ रूपये, पालक ३ ते ५ रूपये जुडी, कांदापात ३ ते ५ रूपये जुडी, गवार ३५ ते ४५ रूपये किलो, कारली २५ ते ३२ रूपये किलो, गाजर ८ ते १२ रूपये किलो, कोबी ६ ते १० रूपये किलो, शेवगा २८ ते ३४ रूपये किलो, परसबी २८ ते ३२ रूपये किलो, काकडी १२ ते १८ रूपये किलो, डांगर भोपळा ६ ते ८ रूपये किलो, दुधी १२ ते १६ रूपये किलो, कोथिंबीर ३ ते ५ रूपये जुडी या दराने भाज्या व पालेभाज्या विकल्या गेल्या.
एप्रिलच्या मध्यानंतर शेतात पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर मार्केटमध्ये भाज्या व पालेभाज्या कमी प्रमाणात विक्रीला येतात. त्याचवेळी भाज्यांना दर प्राप्त होतील, मात्र परराज्यातील भाज्यांचा ओघ त्या काळातही कायम राहील्यास त्या काळातही स्वस्तात भाज्या उपलब्ध राहण्याची भीती भाजी मार्केटमधील किरकोळ व्यापारी दत्ता गावडे यांनी व्यक्त केली आहे.