सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या शाळांतील शैक्षणिक दर्जा अतिशय चांगला असल्याचे विविध परीक्षांच्या निकालांतून दिसून येत असून दरवर्षी महानगरपालिका शाळांतील पटसंख्येतही वाढ होताना दिसत आहे ही समाधानाची बाब असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी महानगरपालिकेने शिक्षण व्हिजन हाती घेत शाळांच्या भव्य व आकर्षक इमारती उभ्या करण्यासोबतच त्याठिकाणी अभ्यासाला पोषक वातावरण निर्मितीकडेही विशेष लक्ष दिले जात असल्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांनाही उत्तेजन देण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित केले जात असल्याचे सांगितले. या आर्थिक वर्षातही शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जात असल्याचे ते म्हणाले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सानपाडा येथील श्रीदत्त विद्यामंदिर नमुंमपा शाळा क्र. 18 ची इमारत व तिस-या मजल्याचे वाढीव बांधकाम तसेच प्रबोधनकार ठाकरे रंगमंच, स्व. गणपत बाळू वास्कर वाचनालय, स्व. शाहीर अनंत ठाकूर बहुउद्देशीय इमारतीच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर जयवंत सुतार यांचेसमवेत ठाणे लोकसभा सदस्य खासदार राजन विचारे, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, स्थायी समितीच्या सभापती श्रीम. शुभांगी पाटील, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, ड प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. संगीता बो-हाडे, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, स्थानिक नगरसेविका श्रीम. कोमल वास्कर, नगरसेवक व्दारकानाथ भोईर, सोमनाथ वास्कर, दिपक पवार, परिवहन सदस्य विसाजी लोके, माजी नगरसेवक विठ्ठल मोरे, रतन मांडवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना खासदार राजन विचारे यांनी 1952 साली प्रारंभ झालेल्या सानपाडा गावातील या तत्कालीन जिल्हा परिषद व आताच्या महानगरपालिका शाळेने गुणवत्तेवर भर देत शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल अभिनंदन केले. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरविण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगत त्यांनी शाळेच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात तिस-या मजल्याचे वाढीव बांधकाम केल्यामुळे शाळेची इमारत अधिक भव्य झाली असल्याचे सांगत याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होईल असा विश्वास व्यक्त केला. सानपाडा ग्रामस्थांसाठी शाळा इमारतीप्रमाणेच रंगमंच, वाचनालय तसेच विविध उपयोगासाठी बहुउद्देशीय इमारत अशा चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्थानिक नगरसेविका श्रीम. कोमल वास्कर यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून सानपाडा व परिसरातील नागरिकांना विविध गोष्टींसाठी उत्तम वास्तू उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे या लोकार्पण समारंभातून सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली. नगरसेवक श्री. सोमनाथ वास्कर यांनी आभार मानले.
जागतिक मराठी भआषा दिन तसेच नमुंमपा शाळा क्र. 18 श्रीदत्त विद्यामंदिर, सानपाडा यांच्या 66 व्या वर्धापनदिन समारंभाचे औचित्य साधून आयोजित विविध नागरी सुविधा वास्तुंच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अयाजुद्दीन शेख व श्रीम. शोभा कुदळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी वर्धापन सोहळ्यात सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना यावेळी उपस्थितांनी दाद दिली.
|