सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : बेपत्ता असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्विनी बिंद्रे-गोरे यांची हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आज पनवेल न्यायालयात याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी क्रमांक तीन कुंदन भंडारी आणि आरोपी क्रमांक चार महेश फळणीकर यांच्या पोलिस कोठडीत पनवेल न्यायालयाने वाढ केली आहे.
सोमवार, ५ मार्चपासून वसईच्या खाडीत आश्विनी बिंद्रेच्या प्रकरणाचा शोध सुरू होणार आहे. आज पोलिसांनी भाईंदर येथील अभय कुरूंदकरांच्या घराची झडती घेवून ज्या फ्रिजमध्ये आश्विनीचे तुकडे करून ठेवण्यात आले होते, तो फ्रिज व फ्रिजखालील स्टॅण्डही पोलिसांनी जप्त केले आहे. ज्या लाकूड कापण्याच्या कटरने आश्विनीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले, पोलिस त्या हत्याराचा शोध घेत आहे.
याप्रकरणी आश्विनीचा शोध घेण्यास पोलिस यंत्रणा एकीकडे टाळाटाळ करत असताना, उदासिनता दाखवित असताना दुसरीकडे आश्विनीचे पती राजू गोरे यांनी पाठपुरावा कायम ठेवला, पोलिस व न्यायालयीन पातळीवर चपला झिजविल्या. राजू गोरे यांच्या पाठपुराव्यामुळेच आश्विनी बिंद्रेप्रकरणातील सत्य आता बाहेर आले आहे. या शोधकार्यात पोलिस अधिकारी संगीता शिंदे-अल्फान्सिसो यांचीही भूमिका महत्वपूर्ण ठरली. सोमवारपासून वसईच्या खाडीत सुरू होणार्या शोधमोहीमेत आश्विनीच्या मृतदेहाचे अवशेष फेकलेली बॅग सापडते का, ज्या हत्याराने मृतदेहाचे तुकडे केले केले ते हत्यार सापडेल का या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.