सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : रायगड जिल्हा टँकर मुक्त करून जिल्ह्यात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
रायगड जिल्हा टँकरमुक्त करण्याची घोषणा जिल्हा परिषदेने केली असून ऑक्टोबर २०१७ ते जून २०१८ पर्यंतचा ०८ कोटी ६३ लाख रूपयाच्या टंचाई कृती आराखड्यात ५०८ गावे १३०९ वाडयांचा समावेश केला आहे. सदर आराखडा रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे जानेवारी २०१८ मध्ये निदर्शनास आले आहे. सन २०१८ च्या टंचाई कृती आराखड्यात १२३१ गावे व वाडयांवर टँकरने करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी ०५ कोटी ३२ लाख रुपये तर ५७९ ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यासाठी ०३ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सन २०१७ च्या प्रस्तावित विंधन विहिरींच्या कामाचे देयक न मिळाल्यामुळे अनेक कामे अपूर्ण राहिली असल्याचे तसेच टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला मोबदला न मिळाल्यामुळे अनेक भागात पाणी पुरवठा केला जात नाही. या प्रकरणी शासनाने चौकशी करून जिल्ह्यात सुरळीत पाणी पुरवठा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत यांनी दाखल केला होता.
या प्रश्नावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हंटले आहे कि, रायगड जिल्हा परिषदेने जिल्हा टँकरमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ऑक्टोबर २०१७ ते जून २०१८ पर्यंतचा ०८ कोटी ६३ लाख रूपयाच्या टंचाई कृती आराखड्यात ५०८ गावे १३०९ वाडयांचा समावेश केला आहे. सदर आराखडा रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविल्याची तसेच सन २०१८ च्या टंचाई कृती आराखड्यात १२३१ गावे व वाडयांवर टँकरने करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी ०५ कोटी ३२ लाख रुपये तर ५७९ ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यासाठी ०३ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची बाब खरी आहे. जानेवारी २०१७ ते जून २०१७ या कालावधीत खोदण्यात आलेल्या १०९ विंधन विहिरींची देयके अदा करण्यासाठी व ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याकरिता निधी अपुरा असल्यामुळे जुलै २०१७ मध्ये देयके पारित करण्यात आली नव्हती. तथापि, आता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने देयके पारित करण्यात येत आहेत. मात्र असे असले तरी, निधी अभावी विंधन विहिरींची कामे अपूर्ण राहिल्याने व टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे देयक अदा न केल्याने अनेक भागात पाणी पुरवठा केला जात नाही, ही बाब खरी नाही.