स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५ /८३६९९२४६४६
नवी मुंबई : देशामध्ये प्रथम क्रमांक आणण्यासाठी कंबर कसलेल्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाने जोरदार परिश्रम केले. या काळात दुकानदारांकडूनही ग्राहकांना प्लॉस्टिक पिशव्या काही काळ मिळणे बंद झाले. तथापि स्वच्छता सर्वेक्षणाचा बोलबाला संपताच नवी मुंबईच्या कानाकोपर्यात किरकोळ दुकानांमध्ये पुन्हा एकवार प्लॉस्टिक पिशव्यांनी आपली पूर्वीची जागा व्यापल्याचे पहावयास मिळत आहे.
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई महापालिका प्रशासनाला यापूर्वी सलग दोन वेळा प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळाले होते. यावर्षी देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सहभाग घेतला. हा सहभाग केवळ सहभागासाठी नसून देशात प्रथम क्रमाकांसाठी असल्याचे जाहिर करत नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सर्व स्तरावर मोहीमा राबविल्या. शहरातील मुख्य रस्ते, अर्ंतगत रस्त्यावर स्वच्छता मोहीमा राबविल्या. डेब्रिज व रॅबिटचे ढिगारेही हटविले. पदपथांची स्वच्छता केली. रस्त्यालगतच्या भिंतीची रंगरंगोटी करत परिसराच्या सुशोभीकरणावरही भर दिला. महापालिका आयुक्तांनीही शहरी भागातील कॉलनी भागात सहभागी होत स्वच्छता सर्वेक्षणाचे गांभीर्य पालिका अधिकारी व कर्मचार्यांच्या निदर्शनास आणूनही दिले. तथापि स्वच्छता सर्वेक्षणामध्ये पालिका कार्यक्षेत्रातील केवळ शहरी भागांचाच कायापालट होत असून ग्रामीण भागांकडे महापालिका प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांच्या युवा पिढीकडून करण्यात आला. सोशल मिडीयावर त्याविषयी नाराजीचे व संतापाचे सूरही उमटले.
या काळात महापालिका प्रशासनाने किेरकोळ दुकानदार, फेरीवाले, पानटपरीवाले, मॉल आदींवर करडी नजर ठेवत त्यांना आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी प्लॉस्टिक पिशव्या न ठेवण्याचे आवाहन केले. ज्या ठिकाणी प्लॉस्टिक पिशव्या सापडल्या, त्या ठिकाणी संबंधितांना दंडीत करण्यात आले. दुकानदारांनीही स्वच्छता सर्वेक्षणाचा धसका घेत आपल्या ग्राहकांनाही प्लॉस्टिक पिशव्या देण्यास नकार दिला. परंतु ही नकारघंटा व प्लॉस्टिक पिशव्या बंदीचे नाट्य औटघटकेचे ठरले. स्वच्छता सर्वेक्षणाचा प्रभाव ओसरताच पुन्हा पानटपरीवर, दुधांच्या डेअरीवर, मॉल, हॉटेल, किरकोळ दुकाने यामध्ये ग्राहकांना प्लॉस्टिक पिशव्यांतून माल देण्यास सुरूवात झाली आहे. खुलेआमपणे ग्राहकांना दुकानांमधून माल आता प्लॉस्टिक पिशव्यांमधून मिळू लागला आहे. त्यामुळे केवळ स्वच्छता सर्वेक्षण राबविण्यासाठीच प्लॉस्टिक पिशव्या बंदीचा फार्स ठरल्याची नाराजी आता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात असून पालिका प्रशासनाच्या अकार्यक्षमतेविषयी संताप व्यक्त करण्यात येवू लागला आहे.स्वच्छता सर्वेक्षणाचा बोलबाला संपताच प्लॉस्टिक पिशव्या बाजारात पुन्हा सरसावल्या असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी सुकुमार किल्लेदार यांनी केला आहे.