पनवेल :- माझा कोळीवाडा… स्वच्छ कोळीवाडा… या मोहिमे अंतर्गत पनवेलच्या कोळीवाड्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जरीमरी पनवेल कोळीवाडा समाज आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वछतेचा हा उपक्रम राबविण्यात आला. सभागृहनेते आणि क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन परेश ठाकूर यांच्यासह रोटेरियन्स आणि रहिवाशी या उपक्रमात सहभागी झाले होते.
देशभरात स्वच्छता अभियान जोमाने राबविण्यात येत असून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत ठिकठिकाणी स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत रविवारी जरीमरी पनवेल कोळीवाडा समाज आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीने पनवेलच्या कोळीवाडा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे कोळीवाडा परिसर चकाचक झाला. ‘माझा कोळीवाडा …स्वच्छ कोळीवाडा…’ हा जनजागृतीचा संदेश यानिमित्त येथील रहिवाशांना देण्यात आला. रोटरी क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्वछता मोहिमेत क्लबचे प्रेसिडेंट डॉक्टर लक्ष्मण आवटे, महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, आरोग्य सभापती डॉ. अरुणकुमार भगत यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, कोळी वाड्यातील बांधव आदी उपस्थित होते. या स्वच्छता मोहीमेत रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने कोळीवाडा परिसर चकाचक झाला होता.