* मुख्यमंत्र्यांचा गुजरात नंतर जय राजस्थानचा नारा
* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा मुख्यमंत्र्यांना विसर…मनसे निषेध
* वाशीत महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन कधी …मनसे सवाल
स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५ /८३६९९२४६४६
नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वी मीरा भाईंदर येथे राजस्थान समाजाच्या मेळाव्याला संबोधताना महाराष्ट्राचे पारदर्शी मुख्यमंत्री यांनी “जय राजस्थानचा” नारा देत लवकरच राजस्थान भवनसाठी राज्य सरकार भूखंड देईल व ते बांधून देईल अशी घोषणा केली. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला असून बहुधा आदरणीय मुख्यमंत्र्यांना ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे व स्मरणशक्तीची काही पुस्तके भेट म्हणून पाठवणार असल्याचे नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
मुळातच या सरकारची व आदरणीय मुख्यमंत्र्यांची अलीकडची काही विधाने ही महाराष्ट्र व राज्यातील मराठी माणसाचा अवमान करणारी आहेत असे दिसते. मध्येच त्यांना भय्यांचा पुळका येतो व उत्तर भारतीय मुंबईची शान असे विधान ते करतात तर नद्या संवर्धनाची ध्वनीचित्रफित हिंदीत येते तर राज्यपालांचे अभिभाषण गुजराती भाषेमध्ये अनुवादित होते. या सर्व प्रकारावरून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याची त्यांची स्मरणशक्ती गेली की काय असा समज आमचा झाल्याकारणाने मनसे मार्फत संयुक्त महाराष्ट्राचा लढा व स्मरणशक्तीची काही पुस्तके आदरणीय मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचे गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या संघर्षाची पुस्तके व स्मरणशक्तीची पुस्तके आदरणीय मुख्यमंत्र्यांना ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचे आठवण करून देतील व आम्हा, महाराष्ट्र, मराठी माणसाला महाराष्ट्र प्रेमी मुख्यमंत्री भेटल्याचा आनंद होईल अशी खोचक टीका मनसेने प्रसिद्धीपत्रकात केली आहे.
गेली १५ वर्षे महाराष्ट्र भवनसाठी नवी मुंबई वाशीत दोन एकराचा भूखंड आरक्षित असूनही सिडको, राज्यसरकारला तेथे महाराष्ट्र भवन बांधता आले नाही. यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांचा बांध फुटला नाही मात्र इतर राज्यांच्या भवनसाठी जागा देण्याची घोषणा करणे म्हणजे मराठी माणसाला व त्यांच्या मतांना गृहीत धरण्याचाच हा प्रकार असल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.