स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ८०८२०९७७७५
नवी मुंबई : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने रविवार, ११ मार्च रोजी युवकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक मार्गदर्शन करणार आहेत.
वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात सकाळी १० वाजता हा मेळावा होत असून वर्षभरावर येवू घातलेल्या लोकसभा-विधानसभा निवडणूकांकरिता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा हा मेळावा आणि त्यामध्ये लोकनेते गणेश नाईकांकडून करण्यात येणारे मार्गदर्शन याकडे सर्व राजकीय घटकांचे लक्ष लागून राहीले आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी दिघा ते बेलापुरदरम्यान युवकांची भक्कम बांधणी केलेली आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर युवकांना मार्गदर्शन करून प्रचारयंत्रणेत युवकांवर विशिष्ठ भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सोपविली जाण्याची शक्यता या मेळाव्याच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.
मोदी लाटेमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत आमदार संदीप नाईकांच्या कार्यप्रणालीमुळे आणि कानाकोपर्यात असलेल्या व्यक्तिगत जनसंपर्कामुळे ऐरोलीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गडाला धक्का लागला नाही. परंतु बेलापुरात मात्र हमखास विजयाची शक्यता गृहीत धरलेल्या गणेश नाईकांना मात्र कमी मतांनी पराभूत व्हावे लागले. अजूनही ऐरोलीच्या तुलनेत बेलापुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची म्हणावी तशी पक्षबांधणी झालेली नाही. काही ठराविक प्रभागात राष्ट्रवादीचे नगरसेवक स्वत:ला स्वयंभू नेते समजू लागले आहेत. आपण सांगू तसे नाईक साहेब वागतात अशा वल्गनाही नेरूळ नोडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही ठराविक नगरसेवक कार्यकर्ते व पदाधिकार्यांसमोर मारताना उघडपणे पहावयास मिळतात. ज्यांना विधानसभा निवडणूकीत लोकनेते गणेश नाईकांना आघाडी मिळवून देता आले नाही, अशा प्रभागातील नगरसेवक कामाचे फोटो टाकत सोशकल मिडीयावर चमकेशगिरी करताना पहावयास मिळत आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघात ठराविक प्रभागांचा अपवाद वगळता आजही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव पहावयास मिळत नाही. विधानसभा निवडणूकीत लोकनेते गणेश नाईकांना मताधिक्य मिळवून देण्यात अपयशी ठरलेले घटक पालिका निवडणूकीत सहज विजयी झाल्याची नाराजी आजही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकार्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेवून लोकनेते गणेश नाईकांनी पुन्हा तळापासून मोर्चेबांधणी करावी आणि दुसर्या आणि तिसर्या फळीतील कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून निवडणूकीचे बिगुल वाजवावे अशी चर्चा कार्यकर्त्यात सुरू आहे. रविवारी होणार्या कार्यकर्ता मेळाव्यात गणेश नाईकांच्या मार्गदर्शनाकडे नवी मुंबईचे लक्ष लागून राहीले आहे.