संदीप खांडगेपाटील :- ८०८२०९७७७५ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई :- २६/११च्या घटनेनंतर सागरी सुरक्षेतील आपल्या राज्याचा गलथानपणा आणि उदासिन कारभार सर्व जगाच्या लक्षात आला. त्यानंतरही सागरी सुरक्षेबाबत गांभीर्य दाखविण्यास चालढकलच केली जात आहे. सागरी सुरक्षेसाठी जेटी, खाडीत व सागरी अर्ंतगत भागात नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना अद्यापि पाच महिने पगारच देण्यात आला नसल्याचे उघडकीस आले आहे. पालघर ते चिपळून दरम्यान सागरी सुरक्षा व्यवस्था सांभाळणार्या सुरक्षा रक्षकांकडून पाच महिने विनावेतन काम करवून घेणारे सरकार त्यांच्याकडून कोणत्या सुरक्षेची आशा करत आहे, असा संतप्त सवाल नवी मुंबईकरांना, ठाणेकरांकडून आणि कोकणवासियांकडून केला जात आहे. आमदार संदीप नाईकांनी आमच्या समस्येला अधिवेशनात वाचा फोडावी, आम्हाला वार्यावर सोडू नये अशी मागणी त्रस्त झालेल्या सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येत आहे.
चिपळून ते पालघरदरम्यान ३२४ सुरक्षा रक्षक सागरी सुरक्षेचे काम पाहत आहेत. या सुरक्षा रक्षकांकडून ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी भागातील सुरक्षा व्यवस्थेचे काम सांभाळण्यात येत आहे. या सुरक्षा रक्षकांना १४ हजाराच्या आसपास वेतन देण्यात येत आहे. गेली पाच महिने या सुरक्षा रक्षकांना वेतनच देण्यात आलेले नाही. सागरी सुरक्षा आम्ही सांभाळतो, पण आमच्या पोटापाण्याचे काय, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, आमदार संदीप नाईकांकडूनच आम्हाला न्याय मिळण्याची खात्री आहे, ते आम्हाला वार्यावर सोडणार नाहीत, त्यांनी चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनात सरकारच्या संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आमची समस्या आणून द्यावी अशी मागणी आता सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येवू लागली आहे.
सागरी भागात, खाडी अर्ंतगत भागात, जेटी परिसरात मासेमारी करणार्या आगरी-कोळी समाजाशिवाय दारू पिणारी टोळकी, गर्दुले आणि अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक पार्ट्यासाठी येतात. त्यांच्याशी सतत आम्हाला संघर्ष करावा लागतो. परंतु सरकार आमच्याकडे लक्ष देत नसल्याचा संताप या सुरक्षा रक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. नवी मुंबई महापालिकेत काम करणार्या उंदीर मारणार्याचा कमी पगार वाढवून देणे, त्यांच्या पगारास विलंब झाल्यास पालिका प्रशासनाला जाब विचारणे अशी कामे करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार्या आमदार संदीप नाईकांनी आम्हालाही न्याय द्यावा. या ३२४ सुरक्षा रक्षकांमध्ये काही सुरक्षा रक्षक नवी मुंबईतील जेटीवर, खाडीअर्ंतगत भागातही कार्यरत आहेत. आमदार संदीप नाईकांकडून आम्ही आशावादी आहोत, आज पगार होत नसल्याने परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. आमदार संदीप नाईक हेच आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देतील याची आम्हाला खात्री असल्याचे अनेक सुरक्षा रक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘नवी मुंबई लाईव्ह’शी बोलताना सांगितले.