* पालिका अधिकार्यां समवेत केली दिघ्यातील समस्यांची पाहणी
नवी मुंबई :- नवी मुंबई शहराचा सर्वांगिण विकास होत असताना प्रत्येकाने शहराच्या विकासात आपले योगदान दिले आहे. शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणार्या दिघा परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभ, आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्र, शैक्षणिक दर्जा उंचावा या अनुषंगाने शाळेची उभारणी, ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरात रस्ता रुंदीकरणातील बांधितांचे पुनवर्सन आणि रखडलेले गाळ्याचे वाटप यासह इतर सुविधांची पुर्तता आगामी कालावधीत करण्यात येईल, असे आश्वासन महापौर जयवंत सुतार यांनी दिघावासियांना दिले.
महापौर जयवंत सुतार यांनी आज, मंगळवार ६ मार्च रोजी दिघा प्रभाग कार्यालयात भेट देऊन पालिका अधिकार्यांशी संवाद साधला त्याच बरोबर दिघा परिसरातील विविध समस्यांची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. याप्रसंगी महापौेरांसमवेत दिघा प्रभाग समितीच्या अध्यक्षा दीपा गवते, स्थानिक नगरसेवक नवीन गवते, समाजसेवक राजेश गवते, प्रभाग समिती सदस्य दामोदर कोटीयान आणि संतोष मुळे त्याच बरोबर शहर अभियंता मोहन डगांवकर, परिमंडळ-१ चे उपायुक्त अमरिश पटनिगीरे, दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमारे आणि अधिकारी वर्ग, नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नगरसेविका अपर्णा गवते गवते यांनी अनेकदा महासभेत सभेमध्ये ठाणे-बेलापूर मार्गावरील रस्ता रुंदी करणातील बांधितांसाठी रामनगर येथील एमआयडीसीच्या ओस-१ भुखंडावर गाळे व घरे बांधण्यात आले आहेत. मात्र त्या गाळ्यांचे वाटप आजवर रखडल्याबद्ल आवाज उठविला होता. आज झालेल्या पाहणी दौर्यांत महापौरांनी या महत्वपुर्ण प्रश्नावर लक्ष वेधले. महापौर सुतार यांनी पालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या समवेत चर्चा करुन या संदर्भात बांधित गाळे धारक व घर मालकांची एक बैठक घेऊन हा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक नवीन गवते आणि नगरसेविका दीपा गवते यांनी रामनगर येथील ओस-१ भुखंडावरील गाळे धारकांसाठी देण्यात भुखंडापैकी उर्वरीत जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे, त्याच बरोबर रामनगर, ईश्वरनगर, विष्णुनगर, आंबेडकरनगर, साठेनगर, रामनगर, दिघागाव येथील स्थानिकांच्या मुलांसाठी इयत्ता १ ली ते १० वीपर्यत नवी मुंबई महापालिकेची शाळा बांधणे तसेच दिघा परिसराला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र दर शुक्रवारी शटडाऊन घेण्यात येत असल्याने थेट रविवारपर्यत पाणी कपातीला सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने या ठिकाणी दिघा वासियांसाठी स्वतंत्र जलकुंभ उभारुन २४ तास मोरबे धरणाचे पाणी देण्याची मागणी केली. त्यावरही महापौर सुतार यांनी यासाठी विशेष निधीची तरदुत करुन पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे त्याच बरोबर घरोघरी शौचालय उभारण्यात आल्याने मलनि:सारण वाहिन्या टाकण्याच्या कामाला लवकर मंजुरी देण्याचे आश्वासित केले.
महापौर सूतार यांनी शहरातील विकासाला अडसर ठरणारी कोणतेही अतिक्रम खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा देत अधिकार्यांना देखील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी, डेब्रिज विषयी तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले.
चौकट
ग्रीन वर्ल्डसह इतर नाल्यावरील स्लॅब तोडण्याचे आदेश
पटनी कंपनी रोडनजीक ग्रीन वर्ल्ड या इमारतीची उभारणी करीत असताना नाला गिळकृत करण्यात आला आहे. तर ठाणे महापालिकेच्या अंतर्गत असणार्या घरांचे पाणी देखील या ठिकाणच्या नाल्या सोडण्यात आले आहे. सदर ठिकाणी करण्यात आलेले नाल्याचे वाढीव बांधकाम त्याच बरोबर गणपती पाडा परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनी नाल्यावरच स्लॅब टाकून नाला बुजविण्याचा आले या दोन्ही ठिकाणी करण्यात आलेले नाल्यावर बांधकाम तातडीने हटविण्याचे आदेश महापौर जयवंत सुतार यांनी अधिकार्यांना दिले आहेत.
गणपती पाडा येथे लवकरच पादचारी पुल
ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवेशद्वार असणार्या दिघा परिसरातील गणपती पाडा, मुकुंद कंपनी व पटनी कंपनी रोड आणि कळवा-विटाव्याकडे जाणारा रस्त्ता या चार रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण लक्षात घेता गणपती पाडा येथे नागरिकांसाठी पादचारी पुल उभारण्यासही महापौरांनी हिरवा कंदील दिला आहे.