स्वयंम न्युज ब्युरो : ९६१९१९७४४४ – ८३६९९२४६४६- ८०८२०९७७७५
नवी मुंबई : पामबीच मार्गावर सारसोळे जंक्शनलगत असलेल्या सारसोळे जेटीतील गाळ काढण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे सदस्य आणि गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी मंगळवारी महापौर जयवंत सुतार आणि पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पामबीच मार्गावर सारसोळे जंक्शनच्या बाजूलाच सारसोळे ग्रामस्थांची जेटी आहे. या जेटीवरूनच सारसोळेचे ग्रामस्थ रात्री-अपरात्री, दिवसाउजेडी भरती आणि ओहोटीचे समीकरण सांभाळत खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी जात असतात. या जेटीवर सारसोळे गाव, नेरूळ पश्चिम आणि पूर्व तसेच शिरवणे गावातीलही सांडपाणी गटारांच्या माध्यमातून येत असते. या सांडपाण्यासोबत मातीही येते. वर्षानुवर्षे सारसोळेच्या जेटीकडे पालिका प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे या जेटीमध्ये गाळाचे साम्राज्य झालेे आहे. वाधवा टॉवरमुळे जेटीवर येणारे पाणी आता पूर्णपणे बंद झाल्यातच जमा असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनातून महापौर व आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
जेटीवर साचलेल्या गाळामुळे भरतीचे पाणी जेटीवर पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. सांडपाणी बंद झाल्याने ओहोटीच्या काळात जेटीवर पाणी दिसत नसल्याने सर्वत्र गाळच पहावयास मिळतो. वाशी सेक्टर १७च्या नाल्यामध्ये पालिका प्रशासन पाण्यात मशिन फिरवून नाल्याची साफसफाई करते. त्याचधर्तीवर जेटीमध्ये मशिन उतरवून सफाई केल्यास या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढणे शक्य होईल. या जेटीवरील गाळ-चिखल काढल्यास जेटीवर भरतीचे पाणीही मोठ्या प्रमाणावर येईल. सारसोळेच्या ग्रामस्थांना आपल्या बोटी थेट जेटीवर आणणे शक्य होईल. आज जेटीपासून काही अंतरावर बोटी उभ्या करून चिखल तुडवित डोक्यावर माशांची वाहतुक करावी लागते. आपण स्वत: या ठिकाणी पाहणी अभियान राबवून या अभियानात आम्हाला सहभागी करून घेतल्यास आपणास समस्येचे गांभीर्य आम्हाला दाखवून देणे शक्य होणार असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या समस्येचे शक्य तितक्या लवकर निवारण होणे आवश्यक आहे. आपण लवकरात लवकर जेटीवर गाळ व चिखल काढून सारसोळेच्या ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.