स्वयंम न्युज ब्युरो : ९६१९१९७४४४ – ८३६९९२४६४६- ८०८२०९७७७५
नवी मुंबई :- सारसोळे जेटीवर निवारा शेड नसल्याने दशक्रिया विधीसाठी आलेल्यांना उन्हातच उभे राहावे लागते. खाडीतून मासे मारून आल्यावर उन्हातच जेटीवर काही सोय नसल्याने सारसोळे गावात जावे लागते. या पार्श्वभूमी सारसोळे जेटीवर निवारा शेड उभारण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समिती सदस्य आणि गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी महापौर जयवंत सुतार आणि पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्याकडे केली आहे.
पामबीच मार्गावर सारसोळे जंक्शनच्या बाजूलाच सारसोळे ग्रामस्थांची जेटी आहे. या जेटीवरूनच सारसोळेचे ग्रामस्थ रात्री-अपरात्री, दिवसाउजेडी भरती आणि ओहोटीचे समीकरण सांभाळत खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी जात असतात. तसेच सारसोळे ग्रामस्थांचे दशक्रिया विधीचे कार्यक्रमही याच जेटीवर होत असतात. खाडीतून दुपारी मासेमारी करून आल्यावर उन्हातच सारसोळेच्या ग्रामस्थांना घरी जावे लागते. दशक्रिया विधीसाठी आलेल्या ग्रामस्थांना विधी पूर्ण होईपर्यत उन्हातच जेटीवर उभे राहावे लागत असल्याचे मनोज मेहेर यांनी़ महापौर व आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या नवी मुंबई शहराच्या निर्मितीमध्ये मुळ ग्रामस्थांचे, प्रकल्पग्रस्तांचे योगदान, त्याग कोणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे आपण सारसोळे जेटीवर ग्रामस्थांकरिता विस्तृत स्वरूपात निवारा शेडची उभारणी करावी ही आम्ही सारसोळे ग्रामस्थांच्या वतीने हात जोडून आपणास विनंती करत असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या ठिकाणी निवारा शेड उभारल्यास खाडीतून मासेमारी करून जेटीवर येणार्या आगरी-कोळी समाजबांधवांना काही क्षण निवारा शेडमध्ये विश्रांती घेणे शक्य होईल. दशक्रिया विधीसाठी आलेल्या ग्रामस्थांना निवारा शेडचा आधार मिळेल. समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून आपण पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सारसोळे जेटीवर निवारा शेडची उभारणी करून सारसोळेच्या ग्रामस्थांना लवकरात लवकर समस्यामुक्त करण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.