नवी मुंबई :- एपीएमसीतील अतिरीक्त भाजीपालाआवारात कृषीपूरक व्यवसाय करण्याकरिता 285 गाळ्यांचे बांधकाम करण्याची परवानगी अखेर देण्यात आली. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर प्रश्न मार्गी लागला असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. यामुळे कृषी उत्पन्न बाजार आवारातील व्यापाऱ्यांना सदरबाबतचे पत्र आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी रामदास चासकर, अँड. राहुल पवार तसेच अनेक व्यापारी उपस्थित होते.
ए.पी.एम.सी.तील अतिरिक्त भाजीपाला आवारात सन २००९ पासून भाजीपाला होत नसल्याने तेथील बंद गाळ्यांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने दिली गेली होती. एपीएमसीतील अतिरिक्त भाजीपाला आवारामधील गाळेधारकांना कृषीपूरक शेतमाल विक्रीकरिता परवानगी देण्यासाठी त्यांनी पणन विभागाकडे पाठपुरावा केला होता. अतिरिक्त भाजीपाला आवारातील २८५ गाळ्यांमध्ये भाजीपाला व्यवसाय होत नसल्याने आठ वर्षापासून हे गाळे बंद होते. त्यामुळे या गाळ्यांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरु करण्याची मागणी गाळेधारकांकडून करण्यात येत होती. या गाळेधारकांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची भेट घेतली होती. त्या नुसार आमदार मंदाताई म्हात्रे यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी कृषी पूरक व्यवसाय करण्यास परवनागी देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता. आता सदर गाळ्यांच्या बांधकामास परवानगी मिळाल्याने व्यापाऱ्यांचे सदरबाबतचे प्रश्न मार्गी लागले आहेत. अतिरिक्त भाजीपाला घाऊक व्यापाऱ्यांनी याबाबत आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.