नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत व विनापरवानगी बांधकामांवर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे मार्गदर्शनानुसार धडक कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने सेक्टर 19, तुर्भे येथे ए.पी.एम.सी मार्केट परिसरातील हॉटेल सैराट येथील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत अतिरिकिच आयुक्त श्री.अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.
हॉटेल सैराट येथील अनधिकृत बांधकामास तुर्भे विभाग कार्यालयामार्फत एम.आर.टी.पी. कायदा 1966 मधील कलम 53(1) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. तरीही त्यांनी हे अनधिकृत बांधकाम काढून घेतले नसल्याने तुर्भे विभागामार्फत जोरदार कारवाई करत अनधिकृत किचन, बाथरूम शेड, गेट, तसेच टेरेसवरील पत्राशेड निष्कासीत करण्यात आले.
या मोहीमेमध्ये 1 जीसीबी, गॅस कॅटर, 15 मजूरांसह तुर्भे विभागातील अधिकारी, कर्मचारी तैनात होते. स्थानिक पोलीस अधिकारी, अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक, कर्मचारी या मोहीमेमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी कार्यरत होते. सदर बांधकाम निष्कासन खर्चापोटी रु.1 लक्ष इतकी रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात आली. यापुढील काळातही सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रआत या मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.