नवी मुंबई :- बेटी बचाव, बेटी पढाव! मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको!, एक नारी सबसे भारी! असे फलक घेऊन आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील महिला डॉक्टर्स व प्रतिभा इन्स्टिटयुट ऑफ नसिर्गच्या विद्यार्थींनींची भव्य बाईक रॅली काढून जनजागृती केली. नवी मुर्ंबतील आदित्य हेल्थ ऍण्ड एज्युकेशन सोसायटी, प्रतिभा इन्स्टिटुट ऑफ नर्सिंग आणि हिम्पाम डॉक्टर संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाशी पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक राणी काळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. वाशी येथील शिवाजी चौक महिलां विषयी पथनाटयातीन जनजागृती केल्या नंतर बेटी बचावच्या वीर घोषणांनी दणाणला होता. भगवे फेटे आणि हातात फलक घेऊन बाईकवर स्वार या डॉक्टर्स आणि परिचारीकांची कोपरखैरणेच्या दिशेने आगेकूच केली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रस्त्यावरील बस थांबा, रिक्षा स्टॅण्ड आणि येणार्या-जाणार्या महिलांना शुभेच्छा देत ही रॅली कोपरखैरणेतील रा.फ.नाईक महाविद्यालयात दाखल झाली.
महिला दिनाच्या या रॅलीच्या समारोपा प्रसंगी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, कार्यक्रमाचे आदित्य हेल्थ ऍण्ड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा कोपरखैरणे ई-प्रभाग समितीचे सदस्य आणि कार्यक्रमाचे आयोजक डॉ.प्रतिक तांबे, प्रतिभा इन्स्टिटुट ऑफ नर्सिंगच्या संचालिका डॉ.विजया तांबे, हिम्पाम संघटनेचे एम.आर.काटकर, श्रमिक शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश नाईक, एफ.जी.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडीक, मुख्याध्यापक थळे सर, मुख्याध्यापिका योजना तिगडे, ई-प्रभाग समिती सदस्य मारुती सकपाळ, डॉ.कृष्णा घोडके, डॉ.माने, डॉ.एम.बी.चौधरी, डॉ.आहेर, डॉ.लांडगे, डॉ.सुरेश पवार, डॉ.कल्याण घोडके, डॉ.रुपाली गोसावी, डॉ.सीमा गाला, नर्सिग सेंटरचे व्यस्थापक किरण शेडगे, शिक्षीका प्रेमा मेहरा, प्रणिता चावके, प्राजक्ता काळे, सायली पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना महापौर जयवंत सुतार यांनी कार्यक्रमाचे आयोजक डॉ.प्रतिक तांबे आणि सहभागी झालेल्या डॉक्टर्स, परिचारिकांचे कौतुक केले. हिम्पाम डॉक्टर्स संघटना नेहमीच सामाजिक कामात पुढे असते असे नमुद करत नवी मुंबईतील डॉक्टरांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे आयोजक डॉ.प्रतिम तांबे यांनी महिला दिनी सामाजिक संदेश देण्या मागे स्त्री-भ्रुण हत्या थांबण्या बरोबरच मुलींचे महत्व प्रत्येक कुटूंबाला कळावे हाच हेतू असल्याचे सांगिहतले. डॉक्टर, परिचारीका हा रुग्णाची सेवा बजावतात. जशी आई आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतात. त्याप्रमाणे वैद्यकीय सेवेला ईश्वर सेवा मानून हे कार्य करीत आहेत, अशा शब्दांत महिला दिनी त्यांचे कौतुक केले.