नवी मुंबई :- महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारांनी समृध्द राहिला असून महिलांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, त्यामुळे केवळ आजचा एक दिवस नाही तर वर्षातील प्रत्येक 365 दिवस महानगरपालिका महिला सक्षमीकरणासाठी कटिबध्द असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण म्हणजेच खरे सबलीकरण हे लक्षात घेऊन बदलत्या काळाची पावले ओळखून महिलांना व्यावसायिकदृष्ट्या उभे करतील असे प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील असे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभानिमित्त ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत व्यासपीठावर आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे, परिवहन समिती सभापती श्री. प्रदीप गवस, विशेष अतिथी कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी उपसंचालक तथा सचिव श्रीम. बसंती रॉय, पूर्णब्रह्म च्या संचालक श्रीम. जयंती कठाळे व श्रीम. वृषाली शिरासाव, कार्यक्रमाच्या निमंत्रक महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम. शिल्पा कांबळी व उपसभापती श्रीम. छाया म्हात्रे आणि इतर महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी विविध क्षेत्रात महिला आघाडीवर असताना आजही स्त्रियांच्या मासिक धर्माबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते, यामुळे स्त्रियांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी याविषयी मुलींना लहान वयातच मुलींना याची योग्य माहिती घरातल्या वडिलधा-या महिलांनी द्यायला हवी असे सांगत त्यांनी शासनाने याविषयी हाती घेतलेल्या स्वच्छता व आरोग्य विषयक अस्मिता या अभिनव उपक्रमाची माहिती दिली.
शिक्षणतज्ज्ञ तथा बोर्डाच्या माजी उपसंचालक तथा सचिव श्रीम. बसंती रॉय यांनी विशेष अतिथी म्हणून बोलताना भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या आठवणींना माहितीसह उजाळा देत आधुनिक वेशभूषा केली म्हणजे आपण आधुनिक झालो काय ? याचा विचार करीत प्रत्येक महिलेने बाईपणाच्या पलिकडे पाहत आपल्या व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे असे मत मांडले.
उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे यांनी कुटूंबात व समाजात स्त्रियांना समान हक्क मिळायला हवेत असे सांगत गृहिणीपदही मानाचे असल्याची भूमिका मांडली. महानगरपालिका राबवित असलेल्या योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक सक्षमतेने काम करण्याची गरज त्यांनी विषद केली.
स्थायी समितीच्या सभापती श्रीम. शुभांगी पाटील यांनी आजची स्त्री सुपर वुमन म्हणून ओळखली जात आहे असे सांगत आपली संस्कृती स्त्रियांचा आदर करणारी असून प्रत्येक आईने आपल्या मुलांवर महिलांचा आदर करणारे संस्कार करावेत त्यामुळे स्त्रियांचा कोणत्याही प्रकारे अनादर होणार नाही अशी भूमिका मांडली.
‘पूर्णब्रह्म’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीम. जयंती कठाळे यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधताना मराठी खाद्यसंस्कृतीला पूर्णब्रह्मच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर घेऊन जातानाच्या प्रवासाची माहिती दिली. नजरेसमोर इप्सित ध्येय असेल आणि त्याच्या पूर्णत्वासाठी मेहनत घेण्याची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही असे सांगत त्यांनी पुरूषांनी महिलांच्या मागे वा पुढे उभे न राहता सोबतीने चालले पाहिजे असे मत मांडले.
‘पूर्णब्रह्म’ च्या ग्लोबल हेड श्रीम. वृषाली शिरासाव यांनी आपल्या स्वयंपाकाचे कौतुक व्हावे ही प्रत्येक स्त्रीचा इच्छा असते असे सांगत पूर्णब्रह्मच्या माध्यमातून आज जग इथल्या स्त्रियांच्या पाककलेचे कौतुक करते आहे याचे समाधान वाटते असे सांगत या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. शिल्पा कांबळी यांनी समितीच्या वतीने महिला व बालकल्याणासाठी राबविल्या जात असलेल्या योजना, उपक्रमांची सविस्तर माहिती दिली तसेच यापुढील काळात अधिक सक्षमतेने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी खारी कळवा प्रकल्पग्रस्त महिला आघाडी , नवी मुंबई या संस्थेस ‘स्वच्छता अभियान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. 21 हजार रक्कम तसेच मानचिन्ह स्वरूपातील हा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्ष श्रीम. जयश्री पाटील यांनी स्विकारला. विशेष महिला उद्योजकता पुरस्कार महिला रिक्षाचालक तथा नर्सरीच्या उदयोन्मुख व्यावसायिक श्रीम. योगिता माने, वाशी यांना 11 हजार रक्कमेसह स्मृतीचिन्ह स्वरूपात प्रदान करण्यात आला.
यावेळी वेशभुषा, महिला भजन मंडळाचे भजन, वक्तृत्व, समुहगायन, समुहनृत्य, समुहनाटिका, हास्य सम्राज्ञी अशा स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचे सादरीकरण करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित हा विशेष समारंभास महिलांची हाऊसफुल्ल गर्दी होती.