पनवेल:- पनवेल-उरण महामार्गावरील वडघर ते चिंचपाडा दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या जलवाहिनीला मानवी चुकांमुळे लागणारी गळती थांबवून पिण्याच्या पाण्याची नासाडी टाळावी तसेच भविष्यातील पाण्याचा दुष्काळ रोखण्यासाठी उपाययोजना आखावी असे साकडे पनवेल संघर्ष समितीने एमजेपीचे कार्यकारी अभियंता अनिल गोगटे यांना घातले.
संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज, गुरुवारी (दि. 8) भेट घेतली. मंडळाचे उप अभियंता पाटील आणि सुरेंद्र दशोरे तसेच संघर्षचे चंद्रकांत शिर्के, उज्वल पाटील, संतोष पवार, मंगल भारवाड, नसीम पठान, रमेश फुलोरे, मनुभाई पटेल, रामाश्री यादव, राजेश पाटील, बाळाराम पाटील, विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
1989 च्या पाणी पुरवठा प्रस्तावानुसार एमजेपीने जलवाहिनी टाकली आहे. काही ठिकाणी ती भूमिगत असती तर पाणी चोरीसाठी ती वारंवार फोडली गेली नसती. पाणी माफियांच्या फायद्यासाठी पाणी पुरवठा अधिकारी आर्थिक दुर्लक्ष करीत असल्याने गळती वाढत चालली आहे. ती न रोखल्यास भविष्यात पाण्याकरिता स्थानिक पातळीवर आपापसात भांडणे आणि हल्ले वाढीस लागणार असल्याने यावर आताच उपाय योजना करावी अशी मागणी कांतीलाल कडू यांनी केली.
——————————————–
महिनाभरात 1 कोटी लिटर पाण्याची नासाडी
वारंवार पाणी गळतीमुळे दुरुस्तीसाठी महिन्यातून किमान चार वेळा पाणी कपात करून बंद ठेवावा लागतो. त्या गडबडीत किमान 1 कोटी लिटर पाणी वाया जात आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. पण जीर्ण झालेली जलवाहिनी आतपर्यंत बदलली न गेल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे.
अनिल गोगटे
(कार्यकारी अभियंता, एमजेपी )