नवी मुंबई :- महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे निर्देशानुसार धडक कारवाई करण्यात येत असून आज वाशी आणि कोपरखैरणे विभागात अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली तोडक कारवाई करण्यात आली.
वाशी सेक्टर 17 येथील प्लॉट क्र.72 याठिकाणी शॉप नं. 29-30 मधील हॉटेल ब्रिस्टा मध्ये 9 मीटर x 3 मीटर आकाराचा पोटमाळा बनविण्यात आला होता. त्याबाबत संबंधितांना एम.आर.टी.पी. कायद्यानुसार रितसर नोटीसही देण्यात आली होती. तथापि याबाबत कोणतीही दखल संबंधितांनी घेतली नाही वा स्वत:हून पोटमाळा काढला नाही त्यामुळे आज वाशीचे विभाग अधिकारी श्री. महेन्द्रसिंग ठोके व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचारी पथकाने 20 पोलीस, 15 कामगार व गॅस कटरच्या सहाय्याने पोटमाळा निष्कासित केला व 25 हजार रूपये रक्कम वसूल केली.
अशाचप्रकारे कोपरखैरणे सेक्टर 4 ए येथील मंदा पाटील यांचे घर व काही व्यवसाय सुरू असलेली कच्ची बांधकामे नवी मुंबई महानगरपालिकेस सिडकोने मैदानाचा भूखंड म्हणून हस्तांतरित केलेल्या जागेत होती. त्यांचे निष्कासन कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी व सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे आणि त्यांच्या पथकाने केले. या बांधकामासही नगररचना कायद्यानुसार रितसर नोटीस बजावण्यात आली होती. तथापि त्याची कोणत्याही प्रकारची दखल संबंधितांनी घेतली नाही. अखेरीस आज अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई करीत ही अनधिकृत बांधकामे तोडली. महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक यांच्या सहयोगाने गॅस कटर, 2 जेसीबी व 2 डंपरच्या सहाय्याने 25 कामगारांसह ही मोहीम पार पडली.
सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये यापुढील काळात या मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.