शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येणा-या साईभक्तांना सुखकर व सुलभ दर्शनाचा लाभ मिळावा याकरीता भव्य असा दर्शनरांग प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पास राज्यशासनाची मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त प्रताप भोसले,उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, मुख्यालेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.हावरे म्हणाले, श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येणा-या साईभक्तांना सुखकर व सुलभ दर्शनाचा लाभ मिळावा याकरीता भव्य असा दर्शनरांग प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जुने प्रसादालयाच्या जागेवर ही इमारत बांधण्यात येणार असून १८,८४८ चौ.मी. बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये मोबाईल व चप्पल लॉकर्स, बायोमेट्रीक पास काऊंटर, पेड पास काऊंटर, लाडू विक्री काऊंडर, उदी व कापडकोठी काऊंटर, बुक स्टॉल, डोनेशन ऑफिस, चहा कॉफी काऊंटर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र असे स्वच्छता गृहे, उदवाहक, आर ओ प्रक्रियेव्दारे शुध्द पिण्याचे पाण्याची, सुरक्षेच्या दृष्टीने फायर फायटींग यंत्रणा व सिक्युरिटी चेक इ. व्यवस्था असणार आहे. या दर्शनरांगेत एकाच वेळी सुमारे १५ हजार साईभक्तांची व्यवस्था होईल. याकरीता ११२.६७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पास राज्यशासनाने मान्यता दिलेली असून हा प्रकल्प लवकरच सुरु होणार आहे.
तसेच मोबाईल फोनचा वाढत असलेला वापर पाहता व्यवस्थापन समितीने साईभक्तांचे सुविधेकरीता संस्थानचे अधिकृत मोबाईल अॅप विकसीत केले असून या अॅपव्दारे साईभक्तांसाठी श्रींचे जिवनकार्य व शिकवणूकीसंदर्भातील साहित्य, दर्शन पास, रुम बुकींग, श्रींचे लाईव्ह दर्शन इ.सुविधा तसेच शिर्डीतील विविध स्थळांची नकाशासह माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदरचे अॅप Android व Apple या
श्री साईबाबांना दररोज दोन टन फुले अर्पण केले जातात. या अर्पण केलेल्या फुलांपासुन अगरबत्ती निर्मितीकरण्याचा निर्णय संस्थान समितीने घेतला होता. त्यानुसार इकोनिर्मिती संस्थेच्या वतीने श्रींना अर्पण केलेले फुले सुकवली जात असून त्यापासून पावडर तयार करुन त्याव्दारे अगरबत्ती निर्मिती करण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या गुढीपाडव्यापासून ही अगरबत्ती साईभक्तांसाठी उपलब्ध होणार आहे. ही अगरबत्ती साईभक्तांकरीता प्रसाद असून त्यांचा सुगंध देशभर दरवळेल.
श्री साईबाबा संस्थानचे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यासाठी राहाता तालुक्याच्या बृह्द आराखड्यात समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामार्फत नियुक्ती करण्यात आलेल्या तज्ञ समितीने शिर्डी येथे संस्थानचे वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रथम प्राधान्याने विद्यापीठाकडे शिफारस केली. विद्यापीठाने सदरचा प्रस्ताव शिफारशीसह शासनाकडे पाठवला आणि विद्यापीठाची शिफारस मान्य करून शासनाने दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार संस्थानला इरादापत्र मंजूर केले आहे.
श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयाच्या वतीने दि. १९ मार्च ते दि.२१ मार्च २०१८ याकालावधीत श्री साईबाबा संस्थान, शिर्डी व Give Me Five Foundation, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थानचे श्री साईनाथ रुग्णालयात मोफत नाकाची प्लॅस्टिक सर्जरी, जळीत रुग्णांवर शस्त्रक्रिया (Burn Contracture) व हत्ती रोगावर शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी या शिबीरांचा लाभ घ्यावा. तसेच श्री साईनाथ रुग्णालयाच्या दोन्ही इमारतीवर तिस-या मजल्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला असून याव्दारे रुग्णांना अधिकाधिक सुविधा देण्याचा संस्थानचा प्रयत्न असल्याचे डॉ.हावरे यांनी सांगितले.