नवी मुंबई :- जागतिक महिला दिनी विष्णुदास भावे नाट्यगृहात उदंड प्रतिसादात संपन्न झालेल्या महिलांच्या विविध कलागुणदर्शन स्पर्धा व गुणवंत महिला व संस्थांच्या गौरव समारंभाप्रमाणेच आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे स्कुल ऑफ हॉस्पॅटिलिटी ॲण्ड टुरिझम स्टडीज यांच्या सहयोगाने ‘घे भरारी’ शिर्षकांतर्गत महिला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 1300 हून अधिक महिला, युवतींनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी केला.
सकाळी 7 वाजता डि.वाय.पाटील स्टेडियमपासून सुरू होऊन पुढे नेरूळ स्टेशनपर्यंत जाऊन पुन्हा परत स्टेडियमपर्यंत अशा 5 किमी अंतराच्या महिला मॅरेथॉनमध्ये विजयी झालेल्या अनुक्रमे ऐश्वर्या मिश्रा, माधुरी देशमुख व शालिनी वाघे या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना स्थायी समितीच्या सभापती श्रीम. शुभांगी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. शिल्पा कांबळी, अतिरिक्त आयुक्त श्री.अंकुश चव्हाण, नगरसेविका श्रीम. शशिकला पाटील, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर व सहा. आयुक्त श्रीम. प्रियांका काळसेकर आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे स्कुल ऑफ हॉस्पॅटिलिटी ॲण्ड टुरिझम स्टडीजच्या मुख्य प्रतिनिधी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील यांनी महिला आपल्या कुटुंबासाठी इतक्या झोकून देऊन काम करतात की त्या स्वत:च्या आरोग्याकडेही फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे हा संदेश प्रसारित करीत या महिला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत महिला व युवतींनी इतक्या मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल कौतुक केले.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. शिल्पा कांबळी यांनी महिलांनी सकाळी लवकर उठून एकत्र येत इतक्या मोठ्या प्रमाणावर मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला याबद्दल निमंत्रक म्हणून आभार व्यक्त करीत यावर्षीचा अनुभव लक्षात घेता पुढील वर्षी मॅरेथॉनमध्ये वयोगट ठेवले जातील असे सांगितले.
अतिरिक्त आयुक्त श्री.अंकुश चव्हाण यांनी ही महिला मॅरेथॉन आयोजित करण्यासाठी दरवर्षी डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे स्कुल ऑफ हॉस्पॅटिलिटी ॲण्ड टुरिझम स्टडीज अतिशय मौलिक मदत करते त्याचा विशेषत्वाने उल्लेख करीत या मॅरोथॉनच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य संवर्धन व स्वच्छतेतून आरोग्य संरक्षण असा दुहेरी संदेश प्रसारित केल्याबद्दल सहभागी महिलांचे आभार मानले.
सकाळी 6.30 वाजल्यापासून या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी महिला व युवतींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभाग आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापिठाचे स्कुल ऑफ हॉस्पॅटिलिटी ॲण्ड टुरिझम स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महिला मॅरेथॉनसाठी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील, श्रीम. शिवानी पाटील व डॉ.शिरीष पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले होते.