समाजसेवा करताना जात, धर्म न पाहण्याचे युवांना आवाहन
नवी मुंबई :- समाजबांधवांना मदत करताना त्यांचा धर्म, जात, पंथ, प्रांत पाहू नका तर माणुसकीच्या नात्याने त्यांना सहकार्य करा, असे आवाहन लोकनेते गणेश नाईक यांनी युवकांना केले आहे. त्याचबरोबर ‘वन बुथ,टेन युथ’ ही संकल्पना मांडून केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर नियमितपणे त्या-त्या बुथमधील नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या सुखदुःखाशी समरस होवून त्यांच्या अडीअडचणी सोडवा, अशी सूचनाही राष्ट्रवादीच्या युवकांना त्यांनी केली.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने रविवारी वाशी येथील विष्णूदास भावे नाटयगृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना लोकनेेते नाईक यांनी उपस्थित युवा कार्यकर्त्यांना संस्काराची शिदोरी देत सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करु नयेत, याचा मौलिक सल्ला दिला. लोकनेते नाईक यांचे विचार ऐकण्यासाठी युवकांनी मेळाव्यास तुफान गर्दी केली होती. नाटयगृहातील स्टॉल, बाल्कनी खचाखच भरुन कार्यकर्ते मधल्या उपलब्ध जागेत खाली बसले होते. तेवढेच कार्यकर्ते नाटयगृहात आणि नाटयगृहाबाहेर उभे होते. ढोल-ताशांच्या गजरात या मेळाव्याला सुरुवात झाली. लोकनेते नाईक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयजयकाराने सभागृह दणाणून गेले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर जयवंत सुतार, मेळाव्याचे आयोजक आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सुरज पाटील यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होेते.
मेळाव्याचे प्रास्ताविक युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी केले. लोकनेते नाईक यांचे नेतृत्व सर्व घटकांना सोबत घेवून जाणारे, माणुसकी जपणारे, विकासाभिमुख नेतृत्व आहे. पदावर असताना जेवढी ते नवी मुंबईकरांची काळजी वाहतात तेवढीच काळजी पदावर नसतानाही वाहतात. नाईक साहेबांच्या कार्यकर्त्याला संपूर्ण राज्यात मान आहे. असंख्य गरजू व्यक्तींच्या समस्या दूर करुन त्यांच्या अश्रूंना आनंदाश्रूत परावर्तीत करणारा जनता दरबारासारखा उपक्रम पुन्हा एकदा भरावा अशी तमाम जनतेची इच्छा असून २०१९मध्ये साहेबांना निवडून देण्याचा निर्धार युवांनी केला असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले. आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भरणार्या रोजगार मेळाव्यातून अनेक युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे. डॉ.नाईक यांनी आपल्या खासदारकीच्या काळात अनेक प्रश्नांची सोडवणूक दिल्ली दरबारी केली आहे. अशा नेतृत्वाचा आम्हाला अभिमान असल्याचे ते म्हणाले. काही जण स्वतःला वाघ आणि नागिन म्हणवून घेतात. अशा प्राण्यांची जंगलात गरज आहे, नवी मुंबईत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला लोकनेते नाईक यांनी युवक असताना त्यांनी जनतेसाठी उभारलेल्या आंदोलनांची माहिती देत युवकांची ताकद सकारात्मक कार्याकडे वळविण्याची आवश्यकता व्यक्त केली. दुसर्यांची मने दुखावणारा धर्म कधीच नसतो असे सांगून दुर्गुणांचा सन्मान करु नका. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असा सल्ला त्यांनी दिला. कधी कधी नालायक माणसे देखील पदावर जातात. त्यांचे समर्थन समाजहितासाठी करता कामा नये, असे मत त्यांनी मांडले. कार्यकर्त्यांनी व्यसनांपासून दूर राहून चांगले आरोग्य राखावे. जनतेसाठी विधायक उपक्रम राबवावेत, असे आवाहन करतानाच युवक मेळाव्याला लाभलेला तुफान प्रतिसाद पाहता नवी मुंबई राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या कार्यकर्त्यांचे शिबीर वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्राच्या प्रशस्त जागेत भरविण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. जात पात धर्माच्या विरोधात लढू नका तर दुष्ट प्रवृत्तींविरोधात लढा, असा सल्ला त्यांनी युवांना दिला.
***********************************
मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच-लोकनेते गणेश नाईक
कार्यकर्ता मेळाव्यानंतर प्रसिध्दी माध्यमांनी लोकनेते गणेश नाईक यांच्याशी संवाद साधला असता पक्षांतराच्या चर्चाविषयी विचारले असता ते म्हणाले की शरदचंद्र पवार यांचे नेतृत्व अष्टपैलू, चतुरस्त्र असून त्यांच्या विचारांशी मी समरस आहे. यापूर्वी देखील मी स्पष्ट केलेले आहे की मी राष्ट्रवादीमध्ये राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कॉग्रेसशी युती होण्याची काही शक्यता आहे काय? या विषयी विचारले असता समविचारी पक्षांची आघाडी होईल, असे संकेत शरदचंद्र पवार यांच्याकडून अलिकडेच जाहीरपणे मिळतात, असे उत्तर त्यांनी दिले.