सुजित शिंदे :९६१९१९७४४४
नवी मुंबई : जे पक्षाची शिस्त पाळत नाही, फ्री मिटींग उपस्थित राहत नाही. महासभेदरम्यान अथवा स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान जे पदाधिकार्यांना अडचणीत आणण्याचे काम करतात, अशा नगरसेवकांच्या मागे गणेश नाईक ताकद लावणार नाही असा खणखणीत इशारा लोकनेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षातील शुक्राचार्यांना दिला असल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये रविवारी सकाळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होेते. या मेळाव्यात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. सर्व खुर्च्या भरून युवक जमिनीवर शिस्तीतही रांगेत बसले होते. व्यासपिठावरही आजी माजी नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी यांची तुडूंब गर्दी होती. या मेळाव्यात युवकांसमोर मार्गदर्शन करताना गणेश नाईकांनी अप्रत्यक्षरित्या संबंधितांना माफक शब्दांमध्ये कानपिचक्या देेत कानउघडणी केली असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसला अपक्षांच्या पाठबळावर स्पष्ट बहूमत असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये गटबाजी निर्माण झालेली आहे. महापालिकेत सत्ता असतानाही शिवसेनेच्या नगरसेवकांची कामे आपल्यापेक्षा लवकर होत असल्याची नाराजी अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांकडून महापालिका मुख्यालयात व्यक्त केली जात आहे. याबाबत संबंधित नगरसेवकांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे महापालिकेत विचारणा केल्यास ते आपल्या पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे सांगून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बोळवण केली जात आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे होत असताना आपण आपल्या प्रभागातील जनतेला काय उत्तर द्यायचे हा असंतोष राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या मनामध्ये खदखदत आहे. महापौर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी शिवसेनेकडून महापौर पदाची निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी केलेल्या एका इच्छूकांकडून मिठाई घेतल्याची चर्चा आजही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्तुळात जोरदार रंगली जात आहे. लोकनेते गणेश नाईकांनी शिरवणेच्या जयवंत सुतारांना महापौर पदी विराजमान केल्याची बाब आजही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ठराविक नगरसेवकांना खटकल्याची उघडपणे पहावयास मिळत आहे. प्रभागात ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर महापौर जयवंत सुतारांचा नामोल्लेख केला जात नाही. ही बाब खुद्द महापौर जयवंत सुतारांच्याही निदर्शनास आलेली आहे.
भावे नाट्यगृहामध्ये लोकनेते गणेश नाईकांनी सुमारे दोन तासापेक्षा अधिक काळ मेळाव्यात सहभागी झालेल्या युवकांना पोटतिडकीने मार्गदर्शन केले. आमदार संदीप नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक हे संपूणर्र् कार्यक्रमात व्यासपिठावर उभे होते.
मेळावा संपल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व माजी विषय समिती सभापती हे जोरदारपणे हास्यविनोद करताना ‘दादांनी जे सांगितले, ते युवकांना सांगितले आहे. आपल्याला नाही. त्यामुळे तु रात्री फोन कर.आपण बसू कोठेतरी’ असे एकमेकांना युवकांसमोर सांगत होते.
ऐरोलीच्या तुलनेत बेलापुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्र्रेसची पक्षबांधणी खिळखिळी आहे. दोन-तीन नगरसेवक प्रभावशाली असले तरी त्यांचा प्रभाग वगळता अन्य प्रभागात त्यांचा प्रभाव नाही. काही नगरसेवक दुसर्या प्रभागातील पक्षबांधणीत मार्गदर्शनाच्या खाली ढवळाढवळ करू लागल्याने अन्य पदाधिकारी त्यांच्याविषयी खासगीत तसेच उघडपणे बोलताना संताप व्यक्त करत आहे. लोकनेते गणेश नाईकांनी पक्षाच्या नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या असल्या तरी येणार्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांना या नगरसेवकांशी मिळतेजुळतेच घ्यावे लागणार असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.