नवी मुंबई :- महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांमध्ये वृक्षप्रेम रूजावे यादृष्टीने सलग 11 वर्षे आयोजित करण्यात येणा-या झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे बारावे प्रदर्शन आणि स्पर्धा याही वर्षी दि. 16 ते 18 मार्च 2017 रोजी, शुक्रवार, शनिवार व रविवारी वंडर्स पार्क, से.19 ए, नेरूळ येथे आयोजित करण्यात येत आहे.
नवी मुंबई शहराला स्वच्छ भारत अभियानामध्ये गतवर्षी देशात आठव्या व राज्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त असून यावर्षी देशात प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी व स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सहयोगाने नवी मुंबईत स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे दिसून येत आहे. ‘माझा कचरा ही माझी जबाबदारी’ मानत नवी मुंबईकर नागरिकांनी, निर्माण होतो त्याच ठिकाणी कच-याचे वर्गीकरण करणे तसेच मोठ्या संस्था, सोसायट्यांनी आपल्या आवारातच त्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवून स्वच्छता आणि पर्यावरणाची जपणूक करण्याचा निश्चय केलेला दिसून येत आहे.
या अनुषंगाने पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही नागरिकांची आवड व्हावी आणि यामधून वृक्षप्रेम वाढीस लागावे यादृष्टीने हे बारावे झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यामध्ये प्रो त्साहनपर विविध स्पर्धा घेऊन लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत आहे.
सुर्यप्रकाशात वाढणारी अथवा सावलीत वाढणारी कुंड्यांमधली बहुवर्षीय फुलझाडे, शोभिवंत पानझाडांची जमिनीवर आकर्षक एकत्रित मांडणी, कुंड्यामध्ये वाढविलेल्या फळभाज्या आणि फळझाडे, विविध भाज्यांची एकत्रित मांडणी, फळफळावळांची एकत्रित मांडणी, कुंड्या/परड्यांमध्ये वाढलेली सिझनल फुलझाडे, कुंड्यांतील फुलझाडे, कुंड्यांमधील सुगंधी व औषधी उपयुक्त वनस्पती, विविध प्रकारचे गुलाब, दांडीसह मोसमी फुले, वार्षिक/बहुवार्षिक दांडीसह फुले, फुलांनी बहरलेल्या वृक्षाच्या दांड्या, निवडुंग मदवृक्ष अननस वर्गीय वनस्पती, आमरी, नेचे, भाज्या फुले फळे यांच्या कलात्मक रचना, निसर्ग व पर्यावरण विषयक चित्रे, सोसायट्या – शाळा – महाविद्यालये – रूग्णालये – बाल्कनी – गच्ची – बंगला – औद्योगिक परिसर – रस्ता दुभाजक याठिकाणच्या बागा अशा विविध 24 विभागांतर्गत प्रोत्साहनपर स्पर्धा घेण्यात येत आहेत. यामध्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता पाने फुले फळे भाजीपाला यांच्या ओळख स्पर्धेचाही समावेश आहे.
या प्रदर्शनात झाडे, फुले, फळे, भाजीपाला यामध्ये निसर्गाने ओतलेली आकर्षक विविधता एकाच ठिकाणी व एकाच छताखाली अनुभवता येणार असून या प्रदर्शनात नामवंत उद्योगसमुह, शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्या लये, गृहनिर्माण संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होत आहेत. या ठिकाणी फुलांची रांगोळी, फळे, फुले, भाज्या यांच्या कलात्मक रचना, बोन्साय, उद्यान रचना अशा आगळ्यावेगळ्या निसर्ग वैभवातील विविधता अनुभवता येणार असून उद्यानाशी संबंधित विविध साहित्य, विविध वृक्ष रोपे, वेली, पूरक खते आदी बाबींचे स्टॉलही उपलब्ध असणार आहेत.
नागरिकांना निसर्गाची विविधता जवळून व प्रत्यक्ष अनुभवता यावी आणि त्यांच्या मनामध्ये वृक्षप्रेमाची रूजवात होऊन त्यांनी आपल्या परिसरात वृक्ष लागवड करावी तसेच त्यांचे संवर्धन करावे हा हेतू नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अथवा स्पर्धेत सहभागी होण्याकरीता अधिक माहितासाठी नागरिकांनी सहा. उद्यान अधिकारी यांचेशी दूरध्वनी क्रमांक 022- 27566063 किंवा 27567064 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.
दि. 16 मार्च रोजी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, इतर मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत, या प्रदर्शनाचा शुभारंभ होत असून पहिल्या दिवशी दुपारी 12 ते रात्रौ 9 वा. पर्यंत तसेच दि. 17 व 18 मार्च रोजी सकाळी 8.30 ते रात्रौ 9 पर्यंत वंडर्स पार्क, से.19 अ, नेरूळ हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी व त्यातही शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेट द्यावी आणि निसर्गातील विविधतेचा जिवंत अनुभव घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे.