नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या माध्यमातून दर्जेदार नागरी सुविधा पुर्तीसाठी मालमत्ता कर हा उत्पन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून या अनुषंगाने मालमत्ता कर थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करीत महसूल वृध्दीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे निर्देशानुसार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा मालमत्ता कर विभागाचे विभागप्रमुख श्री. धनराज गरड यांच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित विभाग कार्यालयांमार्फत थकबाकीसह मालमत्ता कर भरण्यासाठी मालमत्ताकर थकबाकीदारांना 48 तासांची नोटीस बजाविण्यात आली होती. तथापि त्या नोटिसीला प्रतिसाद न देणाऱ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकविणा-या 26 थकबाकीदारांची मालमत्ता अटकावणी करण्यात आली आहे.
यामध्ये सेक्टर 015 बेलापूर येथील भुखंड क्र. 0053 वरील युनिट क्र. 113 ते 117 ही मोतीराम तोलाराम यांची युनिट, सेक्टर 46ए, नेरुळ येथील मे. गेहलोत कंन्स्ट्रक्शन, नेरुळ सेक्टर 42ए येथील पाम टॉवर सोसायटी, सेक्टर 28 नेरुळ येथील शांताराम बामा म्हात्रे व इतर, वाशीगांव येथील रामचंद्र कृष्णा घरत, सेक्टर 10 येथील वेद ॲण्ड संस्कृत शिक्षण डी एस प्रतिष्ठान, वाशीगांव येथील कृष्णा गणपत सुतार, सेक्टर 17 वाशी येथील मिठा इस्टेट प्रा. लि. ची 107 व 338 अशी दोन युनिट्स, सेक्टर 02 येथील मिस्त्री इन्व्हेस्टमेंट मेघराज ॲण्ड मेघदुत, सेक्टर 019 वाशी येथील महाराष्ट्र राज्य माथाडी मंडळ, सेक्टर 23 वाशी येथील अनंत भुकू जाधव, सेक्टर 24 वाशी येथील जेरी वर्गीस, सेक्टर 24 सानपाडा येथील सानपाडा किरण सोसायटी, सेक्टर 03 घणसोली येथील घनश्याम इंटरप्रायजेस यांचे युनिट क्र. 5016 व 5017, सेक्टर 04 घणसोली येथील जॉय वर्गिस परुबली, सेक्टर 25 घणसोली येथील हसमुल्ला हौसिक शेख, सेक्टर 10 ऐरोली येथील देवजी एम. पटेल सेक्टर 20 येथील एकनाथ एम पाटील व इतर (अभिराज बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स), सेक्टर 09 ऐरोली येथील जनार्दन एन. मढवी तसेच सेक्टर 19 ऐरोली येथील गुडविल डेव्हलपर्स अशा 26 थकबाकीदारांची मालमत्ता अटकावणी करण्यात आलेली आहे. या 26 थकबाकीदारांची एकूण थकीत रक्कम रु.4 कोटी 41 लक्ष 68 हजार 475 इतकी आहे.
या थकबाकीदारांना आपली रक्कम भरणा करण्यासाठी 7 मार्च पर्यंत दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. अशाचप्रकारे मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात अटकावणी / जप्तीची कारवाई टप्प्या-टप्प्याने यापुढेही करण्यात येणार असून नागरिकांनी आपली नवी मुंबई महानगरपालिकेकडील कराची थकबाकी तत्परतेने भरणा करावी व कायदेशीर कटू कारवाई टाळावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.