नवी मुंबईतील इमारती 99 वर्षे लीज होल्ड
मुख्यमंत्री यांचे सर्व मागण्या पूर्ण करण्याचे सिडको एमडी व पालिका आयुक्तांना निर्देश
नवी मुंबई:- नवी मुंबई सिडको अखत्यारीतील इमारती फ्री होल्ड तसेच इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भातील बैठक नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सदरबाबत शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता. यावेळी नगरविकास प्रधानसचिव डॉ. नितीन करीर,सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, न.मुं.म.पा. आयुक्त डॉ. रामास्वामी एन. तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई मधील सिडको अखत्यारीतील इमारती फ्री होल्ड व इमारतींचा पुनर्विकास संदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांजकडे सतत मागणी केली होती. सिडकोमध्येही सदरबाबत अनेक बैठका घेतल्या होत्या. सदर विषय अंतिम टप्प्यात आला असताना नवी मुंबईतील सिडको अखत्यारीतील सर्व इमारती सरसकट फ्री होल्ड करण्यात येऊन सदरबाबत रूपांतरण शुल्क रहिवाशी वापराकरिता 30%ऐवजी 5%, वाणिज्य वापरासाठी 35% ऐवजी 20%, सामाजिक वापरासाठी 25% ऐवजी 10% व इतर 35% ऐवजी15% इतका आकारण्यात यावा तसेच सिडकोने घरांचा ताबा देताना सर्व प्रकारचे कर आगाऊ घेतल्याने प्रस्तावित दरांपैकी इतर कोणत्याही प्रकारची कर आकारणी करण्यात येऊ नये, त्यामुळे नवी मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग सुकर होउ शकेल तसेच भाडेपट्यांमध्ये वाढीव बांधकाम केलेले असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची अट सिडकोने टाकण्यात आली असून सदर नियम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात येऊ नये, गावठाण क्षेत्रातील बांधकामासाठी सिडकोने कमीत कमी 2000 चौ.मी. जागा हवी असल्याची अट रद्द करण्यात यावी.
तसेच नवी मुंबईतील सिटीसर्व्हे न झालेल्या गावठाणांचा लवकरात लवकर सिटी सर्व्हे करण्याचे आदेश महापालिका व सिडकोला देण्यात यावेत अशा विविध मागण्या बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केल्या.
यावेळी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी व महापालिका आयुक्त यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या सदर मागण्या त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश देताच त्यांनीही सदर मागण्या तात्काळ मान्य केल्या.
यावेळी संपत शेवाळे, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, राजू तिकोने, विश्वास भोर, भास्कर म्हात्रे, सायस बडे, मुनेन्द्र झा उपस्थित होते.