पनवेल संघर्ष समितीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा दिला लेखी इशारा
उरण :- उरण तालुक्याला ग्रासणार्या प्रदुषणाविषयी आंदोलन छेडणार्या तरूणाला लेखी आश्वासन देवूनही त्याच्या तोंडाला पाने पुसणार्या तहसीलदारांविरोधी पनवेल संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ७२ तासात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची कार्यवाही न झाल्यास तहसीलदारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा लेखी इशारा देण्यात आला आहे.
बेलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी नोव्हेंबरमध्ये प्रदुषणासह काही महत्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रव्यवहारानंतर दास्तानफाटा येथे उपोषण छेडले होते. त्यावेळी उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी मागण्यांची पूर्तता करणारे आश्वासनांचे लेखी पत्र तसेच त्यासंदर्भात तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकांचे इतिवृत्त म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
दरम्यान, पाच महिन्यानंतरही तहसीलदार कल्पना गोडे यांना, त्यांनीच दिलेल्या लेखी आश्वासनांचा विसर पडल्याने अजित म्हात्रे यांनी पुन्हा चार दिवसांपासून दास्तान फाटा येेथे उपोषण सुरू केले आहे. गोडे यांनी कालच त्यांची भेट घेवून उपोषण मागे घेण्याची विनंती म्हात्रे यांना केली. परंतु, जोपर्यंत कार्यवाहीला प्रारंभ होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याने तहसीलदारांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. तरीदेखील प्रदुषण नियामक मंडळाच्या नियम, अटी व शर्थीचे पालन करण्यावर तहसीलदारांचे निर्बंध नसल्याने तहसीलदार नेमके कुणासाठी कार्यरत आहेत, असा प्रश्न म्हात्रे विचारत आहेत.
यासंबंधी पनवेल संघर्ष समितीने अजित म्हात्रे यांच्या सामाजिक उपोषणास आज प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला आहे. संपूर्ण उरण तालुक्यातून म्हात्रे यांना पाठिंबा मिळत आहे. हाच धागा पकडून तहसीलदारांनी कर्तव्य बजावताना हलगर्जीपणाचा अक्षम्य गुन्हा केल्याने येत्या ७२ तासात लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्यास त्यांच्याविरोधात महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा कांतीलाल कडू यांनी लेखी स्वरूपात दिला आहे. गोडे आज कार्यालयात उपस्थित नसल्याने, हे निवेदन महसूल विभागाचे नायब तहसीलदार नरेश पेडवी यांच्याकडे संघर्षने सुपूर्द केले.
उरणला अपघाताचा मोठा धोका जाणवत असताना अवजड वाहनांवरही प्रशासनाचे बंधन राहिले नाही. दगड माती उतखनन आणि वाहतुकीला रात्री बंदी असताही बिनदिक्कितपणे उत्खनन सुरू आहे. धुळीचा होणारा त्रास वाचविण्यासाठी सक्शन पंपाची व्यवस्था करण्याचेही आश्वासन गोडे यांनी पाच महिन्यांपूर्वी म्हात्रे यांना दिले होेते, त्याचे स्मरण करून देत संघर्ष समितीने गोडे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच यापुढे अपघात घडल्यास तहसीलदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे त्या निवेदनातून कडू यांनी स्पष्ट केले आहे.
याप्रसंगी संघर्षचे उज्वल पाटील, चंद्रकांत शिर्के, मंगल भारवाड, पत्रकार घनःश्याम कडू, राजकुमार भगत, जीवन केणी आदी जण उपस्थित होते.